माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्वयंसेवक प्रथमेश चाटे याचे
अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
यांच्या वतीने आयोजित “राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिर – २०२६”
हे अमरावती जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथे
दिनांक ७ ते ११ मार्च २०२४ दरम्यान उत्साहात पार पडले. या राज्यस्तरीय शिबिरामध्ये
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ४ विद्यार्थ्यांच्या
संघाने उत्साहाने सहभाग नोंदविला.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध साहसी क्रीडा प्रात्यक्षिके, साहसी खेळ, गटक्रिया, शारीरिक तंदुरुस्ती व नेतृत्व विकासाशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात
आले होते. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग
नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली.
या शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी, नेतृत्वगुण
व सक्रिय सहभाग याबद्दल विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक प्रथमेश चाटे
यास “उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक” या सन्मानाने
गौरविण्यात आले. या यशामुळे विद्यापीठाचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांमध्ये
उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्वयंसेवक प्रथमेश चाटे याचे अभिनंदन करून
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी अशा साहसी व व्यक्तिमत्व
विकास घडविणाऱ्या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. राजेश कदम यांनीही
विद्यार्थ्याचे अभिनंदन करून अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास
विकसित होतो, असे मार्गदर्शन केले.



