Wednesday, March 4, 2026

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीद्वारे भूमातेचे आरोग्य समृद्ध करावे..... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित नैसर्गिक शेतीतील पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नैसर्गिक शेतीतील पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ३ मार्च २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे उपक्रम प्रभावीपणे राबवून भूमाता इतकी समृद्ध करावी की बाह्य अन्नघटकांची आवश्यकता भासू नये, असे प्रतिपादन केले. गुजरातमध्ये माननीय राज्यपाल महोदयांच्या प्रेरणेने सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे मॉडेल यशस्वीरीत्या राबविण्यात आले असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठे व माफसू विद्यापीठ यांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२६ महिन्यात महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांत टप्प्याटप्प्याने शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून राज्यातील जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले व हा उपक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवसारी कृषि विद्यापीठ (गुजरात) अंतर्गत एन. एम. कृषी महाविद्यालयातील कृषीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. के. ए. शाह उपस्थित होते. त्यांनी नैसर्गिक शेतीतील पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. पिकांच्या योग्य वाढ व विकासासाठी आवश्यक १७ अन्नद्रव्ये, त्यांचे स्रोत जसे की शेणखत, कंपोस्ट, पिकांचे अवशेष, हिरवळीचे खत, वर्मी कंपोस्ट इत्यादींबाबत माहिती दिली. तसेच नैसर्गिक शेतीत पोषक तत्त्वांची पूर्तता करून उत्पादकता व गुणवत्तेत वाढ करण्याचे प्रभावी उपाय त्यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तरांच्या सत्रातून शेतकरी व सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी तसेच विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हिंदी भाषेत पार पडला.