Wednesday, March 25, 2026

खेळातून सर्वांगीण विकास; “खेळ आहे तर सर्व आहे” — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि.

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धां उत्साहात संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यापीठस्तरीय कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६ चे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ दि. २५ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडले.

या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच परभणी मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, घटक व खाजगी कृषि तंत्र विद्यालयांचे प्राचार्य आणि क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष श्रृंगारे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना खेळातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे प्रतिपादन केले. “खेळ आहे तर सर्व आहे” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. खेळाच्या माध्यमातून मराठवाडा विभागातील कृषि तंत्र विद्यालयांतील विद्यार्थी व कर्मचारी यांची परस्पर भेट होऊन विचारांची देवाण-घेवाण होते, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होते तसेच संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचे भविष्यातील विकसित भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी खेळाडूंना प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि क्रीडास्पृहा जोपासण्याचा संदेश दिला. शेवटी, सर्व स्पर्धकांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करून विजयासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, खेळामुळे मानवी आरोग्य सुधारते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत.

क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, उपकुलसचिव (विद्या) डॉ. गजानन भालेराव, तसेच सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी विजेत्या संघाचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे यांनी तसेच सूत्रसंचालन श्री. अशोक खिल्लारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी केले.

या क्रीडा स्पर्धेत मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यांतील ६ घटक कृषि तंत्र विद्यालयांसह एकूण ५१ कृषि तंत्र विद्यालयांच्या जिल्हास्तरावरील विजयी संघांचे सुमारे ४०० खेळाडू, संघव्यवस्थापक व प्राचार्य सहभागी झाले होते. स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच या सांघिक खेळांसह धावणे, गोळाफेक, लांब उडी, संगीत खुर्ची, दोरीवरील उड्या व रांगोळी अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.