‘मिनी सरस’ महोत्सव महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाभदायक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना हक्काची
बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, उमेद अभियान व
जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री
प्रदर्शन व खाद्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक १२ ते १७
मार्च २०२६ या कालावधीत विद्यापीठाच्या शेतकरी भवन मैदान, काळीकमान
येथे आयोजित करण्यात आला असून त्याचा भव्य शुभारंभ दिनांक १२ मार्च रोजी माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि जिल्हा परिषद परभणीच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांच्या हस्ते झाला.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर तसेच जिल्हा
अभियान व्यवस्थापक श्री. दीपक दहे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी
त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे तसेच त्यांच्या कौशल्याचे व उत्पादित वस्तूंचे
प्रदर्शन आणि विक्री करून त्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे. या
उद्देशाने आयोजित केलेला ‘मिनी सरस’ महोत्सव महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
महिला स्वयंस्फूर्त असतात, मात्र त्यांना योग्य पाठबळाची गरज
असते. कृषि विद्यापीठ महिलांना प्रक्रिया उद्योगातील उत्पादन, पॅकेजिंग व विक्री व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी सदैव
तत्पर आहे. विशेषतः महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांवर लेबलिंग व योग्य
पॅकेजिंग करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या महोत्सवात परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला बचत गटांनी विविध
प्रकारचे स्टॉल्स उभारले आहेत. खाद्य महोत्सवात मांडे, पुरणपोळी, दही धपाटे, हुर्डा पार्टी, भरड
धान्यांपासून तयार केलेले पदार्थ, पाणीपुरी चाट तसेच अस्सल
मराठवाडी व्हेज व नॉनव्हेज जेवण यांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध आहे. याशिवाय
सेंद्रिय हळद, विविध डाळी, मसाले,
लोणचे, पापड, काजू,
बेदाणा, केळी चिप्स यांसारखी घरगुती उत्पादने
विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. शोभेच्या वस्तू, कापडी पिशव्या,
लाकडी कोळपाट, खपली गहू आदी वस्तूही
प्रदर्शनात उपलब्ध आहेत.
महोत्सवात कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माहितीपर
स्टॉल्सचीही मांडणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या मनोरंजनासाठी दररोज
सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
परभणीकरांनी आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला भेट देऊन ग्रामीण महिलांच्या
परिश्रमातून तयार झालेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर आणि प्रकल्प संचालक डॉ.
स्मिता पाटील यांनी केले आहे.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक धनंजय भिसे, विठ्ठल मुळे,
गजानन सोनावणे तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील उमेद अभियानाच्या
संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.


