Friday, March 6, 2026

वनामकृविच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्राला भाकृअपच्या तेलबिया संशोधन संस्थेच्या संचालकांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राला दिनांक ६ मार्च २०२६ रोजी भाकृअपच्या हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे (ICAR–Indian Institute of Oilseeds Research) माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर यांनी भेट दिली. यावेळी तेलबिया संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. कादिर वेल, डॉ. आर. डी. प्रसाद, डॉ. जी. डी. सतीश कुमार तसेच विद्यापीठाचे डॉ. एच. व्ही. काळपांडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश धुतमल, डॉ. अनंत लाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर म्हणाले की, सेंद्रिय शेतीमालाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. शेतकरी गट तयार करून प्रक्रिया, मूल्यवर्धन व ब्रँडिंग केल्यास शेतीमालाला अधिक चांगला दर मिळू शकतो. तसेच फळे व भाजीपाला पिकांमध्ये प्लास्टिकविरहित मल्चिंगचा वापर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. आनंद गोरे यांनी केंद्रात सुरू असलेल्या सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील संशोधन व विस्तार उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी गांडूळ खत संच, दहा ड्रम थिअरी युनिट तसेच लाल कंधारी गाईंचे एकक यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या पद्धतींचा अवलंब केल्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते, अवशेषमुक्त शेतीमालाचे उत्पादन होते तसेच उत्पादनाची साठवण क्षमता (शेल्फ लाइफ) वाढते, असे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. अनंत लाड यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीतील पीक संरक्षणाच्या उपाययोजनांबाबत प्रमुख पाहुण्यांना माहिती देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान शेतकरी व शास्त्रज्ञांनी नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली तसेच अनुभवांची देवाणघेवाण केली.