समाजातील एखादी
व्यक्ती किती मोठी आहे हे तिच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या वाटपावरून ठरते. स्वतःला मिळालेली
ज्ञानाची शिदोरी इतरांसोबत वाटण्यात जी व्यक्ती धन्यता मानते, तीच व्यक्ती समाजाच्या हृदयात स्थान मिळवते. त्याच
धर्तीवर शासनाकडून पुरस्काराने सन्मानित झालेल्या शेतकऱ्यांनी किमान दहा शेतकरी आपल्या
बरोबरीचे घडवावेत, अशी अपेक्षा माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केली.
ते वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या
छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवरील कृषि तंत्र विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक ६
मार्च २०२६ रोजी आयोजित कृषिधारा जिल्हास्तरीय कृषि महोत्सवात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य
व देशात एकीकडे काही प्रगत शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेत
आहेत. त्यांनी अवलंबलेले तंत्रज्ञान व मिळवलेली माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे
गरजेचे आहे, जेणेकरून सर्व शेतकरी प्रगतीच्या एकाच स्तरावर येऊ
शकतील. यासाठी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील तंत्रज्ञान व अनुभव इतर
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत.
विद्यापीठ ‘शेतकरी
देवो भवः’ या भावनेतून कार्य करत असून माझी ओळख ‘शेतकऱ्यांचा कुलगुरू’ म्हणून झाली
आहे, हे माझ्यासाठी नक्कीच
भूषणावह आहे. शेतकरी समाजातील एक आदर्श घटक आहे. ते शेतीत उत्तम काम करतात;
मात्र त्या कामाची नोंद ठेवत नाहीत. पुरस्कारासाठी आवश्यक कागदपत्रे
व नोंदी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळे येथून पुढे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीविषयक
कामांची वैयक्तिक नोंदवही ठेवण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी
सांगितले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे होते. यावेळी सहयोगी संचालक
(संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख, डॉ.
संजय पाटील, डॉ. दीप्ती पाटगावकर, आत्मा
प्रकल्प संचालक सौ. धनश्री जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी सौ.
अश्विनी पठारे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री. दत्ता
मुळे, कृषि उपसंचालक श्री. दीपक गवळी आदी मान्यवर व्यासपीठावर
उपस्थित होते.
विभागीय कृषि सहसंचालक
सुनील वानखेडे म्हणाले की, शेतकरी चांगले उत्पादन
घेतात; मात्र विक्री व्यवस्थेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा
लागतो. अशा महोत्सवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची थेट विक्री करण्याची
संधी मिळते आणि त्यातून अधिक उत्पन्नही मिळू शकते.
प्रास्ताविकात
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकार काही
पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. भरडधान्य, कडधान्य व तेलबिया पिकांचे महत्त्व शेतकऱ्यांना
पुन्हा एकदा पटवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन श्री.
संजीव साठे यांनी केले, तर आभार उपविभागीय कृषि
अधिकारी सौ. अश्विनी पठारे यांनी मानले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. पांडुरंग इनामे,
श्री. दादासाहेब शिंदे, शेतकरी शास्त्रज्ञ श्री.
यज्ञेश कातबने, श्री. लक्ष्मण आहेर, श्री.
बाबासाहेब पडूळ यांच्यासह कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.




.jpeg)