Tuesday, March 24, 2026

‘शेतकरी देवो भव’ संकल्पनेतून ज्वारी क्षेत्रवाढीसाठी ठोस उपाययोजनांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 वनामकृविच्या ज्वार संशोधन केंद्रात प्रोत्साहनपर कार्यशाळा व अवजारे वाटप कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत ज्वार संशोधन केंद्र व अखिल भारतीय समन्वयित ज्वार सुधार प्रकल्प, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना (एस.सी.एस.पी.) अंतर्गत प्रोत्साहनपर कार्यशाळा व अवजारे वाटप कार्यक्रमाचे दिनांक २४ मार्च २०२६ रोजी आयोजन पशुसंवर्धन यांत्रिकीकरण केंद्राच्या सभागृहात करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे तसेच अ.भा.स. पशु शक्तीचा योग्य वापर योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. दयानंद टेकाळे उपस्थित होते. यावेळी ज्वार संशोधन केंद्राचे माजी प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे यांचीही उपस्थिती लाभली.

उद्घाटनपर भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘शेतकरी देवो भव’ या संकल्पनेचे महत्त्व विशद करताना शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची गरज अधोरेखित केली. ज्वार संशोधन केंद्राच्या शतकीय गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत त्यांनी ज्वारी उत्पादनात झालेली वाढ नमूद केली; मात्र मागील काही दशकांत ज्वारीखालील क्षेत्र घटत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. बदलते हवामान, बाजारपेठेतील अनिश्चितता, तसेच पिकांच्या निवडीतील बदल ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सखोल कारणमीमांसा करून क्षेत्रवाढीसाठी ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. सुधारित वाणांचा प्रसार, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रक्रिया व मूल्यवर्धनावर भर, तसेच बाजारपेठेशी थेट जोडणी यावर त्यांनी विशेष भर दिला. जनजागृतीसाठी अशा कार्यशाळा, प्रात्यक्षिके व शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. तसेच, मूल्यवर्धन ही काळाची गरज असून ज्वारीपासून विविध पौष्टिक व बाजारपेठाभिमुख उत्पादने तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना संशोधन, विस्तार आणि शेतकरी यांच्यात सुसंवाद व समन्वय वाढविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान अनुसूचित जातीतील ५० लाभार्थी शेतकऱ्यांना शेती अवजारे, विविध निविष्ठा, विद्यापीठ दिनदर्शिका तसेच ज्वारीपासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांचे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविकात ज्वारी संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी डॉ. अंबिका मोरे यांनी केंद्राच्या संशोधन कार्याचा आढावा घेत एस.सी.एस.पी. योजनेअंतर्गत अवजारे वाटपाचा उद्देश स्पष्ट केला. तांत्रिक सत्रात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. गजानन गडदे, डॉ. अंबिका मोरे, डॉ. दडके, प्रा. प्रीतम भुतडा व डॉ. प्रशांत अंबिलवादे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. गणपत कोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्वारी संशोधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.