Saturday, March 7, 2026

वनामकृविच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर वृक्ष लागवड कार्यक्रमाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, वन विभाग जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्र अंतर्गत सायळा ब्लॉकमधील गट क्रमांक ३१ ते ४५ आणि ९१ ते १०३ या परिसरात विविध फळझाडे व औषधी वनस्पतींच्या रोपांचे वनक्षेत्र विकसित करण्यासाठी वर्ष २०२५–२६ साठी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते दिनांक ७ मार्च २०२६ रोजी करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत सुमारे ३० मीटर रुंदी आणि ९ किलोमीटर लांबीच्या परिसरात एकूण १२.०० हेक्टर क्षेत्रावर विविध फळझाडे तसेच औषधी वनस्पतींची लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ आणि विद्यापीठ परिसर अधिक हरित करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून तो सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भूमिपूजन करून वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोपांचे प्रतीकात्मक लागवड करण्यात येऊन पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, डॉ. हिराकांत काळपांडे तसेच जिंतूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्ष लागवड ही पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून, विद्यापीठ आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणारा हा उपक्रम परिसरातील हरित क्षेत्र वाढविण्यासोबतच जैवविविधतेच्या संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास वन विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.