समाज विचारांनी समृद्ध झाला पाहिजे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे पद्मश्री
सन्मानित सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्मिता कोल्हे आणि डॉ. रवींद्र कोल्हे यांचा
अधिकारी व विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा
कार्यक्रम सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता
विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांच्यासह शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नूतन
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंतराव जामकर, सामारीतनस (SAMARITANS)
सेवाभावी संस्थेचे श्री. रामकुमार व श्री. दामोदर आदी मान्यवर
उपस्थित होते.
संवाद
कार्यक्रमात डॉ. स्मिता कोल्हे व डॉ. रवींद्र कोल्हे यांनी ग्रामीण आरोग्य सेवा, सामाजिक बांधिलकी तसेच आदिवासी व ग्रामीण
भागातील विकासासाठी केलेल्या कार्याबाबतचे अनुभव विद्यार्थ्यांशी व अधिकारी
वर्गाशी शेअर केले. मेळघाटातील दुर्गम भागात राहून आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेले कार्य देशभरात आदर्श
मानले जाते. विद्यार्थ्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने
विद्यापीठाच्या वतीने या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षीय भाषणात
माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, आव्हानांचा स्वीकार करणारी व्यक्तीच जीवनात
खऱ्या अर्थाने यशस्वी होते. कोल्हे दांपत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम
करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. परस्परांच्या साथीने व धैर्याने केलेले
कार्य नक्कीच यशस्वी होते, हा संदेश त्यांच्या कार्यातून
मिळतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधेपणा, सात्विकता आणि
अहंकारविरहित कार्यपद्धतीचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की, समाज केवळ पैसा, शक्ती किंवा शिक्षणाने नव्हे तर
विचारांनी समृद्ध झाला पाहिजे. विद्यापीठात सध्या ६० टक्क्यांहून अधिक
विद्यार्थिनी शिक्षण घेत असून अशा प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे त्यांना भावनिक व
सामाजिकदृष्ट्या समृद्ध होण्याची संधी मिळते. हा कार्यक्रम श्री. हेमंतराव जामकर व
डॉ. रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून आयोजित करता आला, यामुळे त्यांचे माननीय कुलागुरुनी
आभार मानले.
यावेळी
पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी मेळघाटातील आदिवासी समाजामध्ये केलेल्या
कार्याचा अनुभव सांगितला. सुरुवातीला महिलांच्या अनेक समस्या होत्या. त्यावर चिंतन
करून सामाजिक परिवर्तनाची उभारणी करण्यात आली. वैयक्तिक आयुष्यातील सुखसोयी असूनही
समाधान मिळत नसल्याने त्यांनी समाजकार्यात उतरून आदिवासी समाजासोबत राहून
त्यांच्या जीवनमानात बदल घडवण्याचा प्रयत्न केला.
पद्मश्री डॉ.
रवींद्र कोल्हे यांनी आदिवासी समाजातील महिलांचे अधिकार, त्यांच्या संस्कृतीतील वैशिष्ट्ये तसेच आरोग्य,
शिक्षण व शेती विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. आदिवासी
समाजात महिलांना अनेक अधिकार असून पंचायत व्यवस्थेत त्यांना महत्त्वाचे स्थान आहे,
असे त्यांनी सांगितले.
श्री.
रामकुमार यांनी सामारीतनस संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास
विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक,
अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. रणजीत चव्हाण
यांनी केले.

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
