Wednesday, March 18, 2026

गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व पारंपरिक ज्ञानाचा वापर आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 कापूस संशोधन योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कापूस संशोधन योजना व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (IRM) – गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार” प्रकल्पांतर्गत दरवर्षी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने चालू वर्षातील प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १७ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकातील कीड व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. विशेष अतिथी म्हणून संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, प्रमुख पाहुणे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे व संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार हे उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी (पशु शक्तीचे यांत्रिकीकरण) डॉ. दयानंद टेकाळे, कापूस संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. मेघा जगताप, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिगंबर पटाईत तसेच प्रगतिशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे नमूद केले. या अळीवर प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित साधने, मोबाईल अ‍ॅप्स तसेच पारंपरिक ज्ञान (Indigenous Technical Knowledge - ITK) आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा अनुभवपूर्वक वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. पुढे त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संशोधनाची दिशा निश्चित करणे आवश्यक असून विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांपर्यंत वेगाने व्हावा, यासाठी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांचा विस्तार कार्यात सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. याबरोबरच ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रमांतर्गत शेतीविषयक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणेही तितकेच आवश्यक असून विद्यार्थ्यांमध्ये कृषी शिक्षणाची गोडी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठात सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकीकरण पद्धतीने करण्यात आलेल्या कापूस लागवडीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणांबाबत मार्गदर्शन करून उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी इस्रायल देशाच्या कृषि अभ्यास दौऱ्यावरून परतलेले प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांचा विद्यापीठातर्फे माननीय कुलगुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी घन पद्धतीने कापूस लागवड (HDPS) तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले, तर डॉ. दयानंद टेकाळे यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या बैलचलित अवजारांबाबत व यांत्रिकीकरण तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांकडून प्रश्नावलीद्वारे कापूस लागवड व कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाबाबत अभिप्राय नोंदविण्यात आला, ज्याचा उपयोग पुढील संशोधन व विस्तार कार्यासाठी होणार आहे.

यावेळी उपस्थित खांबेगाव (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील शेतकरी प्रतिनिधी श्री. सुरेश शृंगारपुतळे यांनी प्रकल्पाबद्दल मनोगत व्यक्त करत विद्यापीठाशी सातत्याने संपर्क ठेवल्यामुळे त्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले.

प्रास्ताविक डॉ. मेघा जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले आणि आभार श्रीमती सारिका नारळे यांनी मानले.

या कार्यक्रमास माखणी, खांबेगाव (ता. पूर्णा), खानापूर, आर्वी, दैठणा (ता. परभणी) तसेच सायाळा (ता. लोहा, जि. नांदेड) व परभणी जिल्ह्यातील विविध गावांमधून आलेले शेतकरी व विद्यापीठातील कर्मचारी असे एकूण सुमारे ८० जण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयआरएम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. इरफान बेग, यंग प्रोफेशनल श्री. नारायण ढगे, श्री. आशिष अंभोरे, श्री. गजानन रोही, श्री. अनिल ठाकर, श्री. विलास ढगे, श्रीमती अंजली इंगळे, श्री. सचिन रणखांब व श्री. प्रशांत पंडित यांनी परिश्रम घेतले.