वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थ्यांच्या मानसिक
स्वास्थ्य, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन वाढीसाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत युथ हॅपिनेस प्रोग्राम या विशेष अभ्यासक्रमाचे दिनांक
४ ते ८ मार्च २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून त्यांनी या उपक्रमासाठी
शुभेच्छा दिल्या.
अभ्यासक्रमाचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या
अध्यक्षतेखाली दिनांक ४ मार्च रोजी संपन्न झाले. या वेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता
डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड, तसेच विद्यापीठाचे माजी वैद्यकीय अधिकारी
व प्रशिक्षक डॉ. सुब्बाराव आणि प्रशिक्षक श्री. श्रीकांत पंडित उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थी अवस्थेत
ताण-तणाव कमी करण्याची गरज अधोरेखित करत जीवन जगण्याची कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक
असल्याचे सांगितले. विद्यापीठ विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याची जबाबदारी
समजून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या अभ्यासक्रमाद्वारे
सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित करावा, मन स्थिर ठेवून योग्य दिशेने विचार कसे
घडवावेत हे शिकता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच स्वतःही
या अभ्यासक्रमातील क्रिया नियमित करत असल्याने मनातील विचारांवर नियंत्रण ठेवता येऊन
आनंदी जीवन जगण्यास मदत होत असल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. या अभ्यासक्रमाचे
विविध टप्पे असून सध्या विद्यार्थ्यांना मूलभूत अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे. यामुळे
विद्यार्थ्यांना करिअरविषयक निर्णय घेण्यासही मदत होईल, म्हणून
सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी
केले.
यावेळी डॉ. सुब्बाराव यांनी सांगितले की, विद्यापीठात आर्ट ऑफ लिव्हिंग उपक्रमाची
सुरुवात मे २००२ मध्ये झाली होती. त्या वेळी केवळ २३ जणांनी प्रशिक्षण घेतले होते,
ज्यामध्ये या विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरूंच्या कुटुंबातील चार सदस्य
तसेच विद्यापीठाचे तीन संचालक सहभागी होते. पुढील काळात या उपक्रमाचा विस्तार होत जाऊन
विद्यापीठात शंभरहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज या उपक्रमाचा वटवृक्ष होऊन
हा दैदीप्यमान कार्यक्रम सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व विद्यापीठ प्रशासनाचे
आभार मानले.
श्री. श्रीकांत पंडित यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले
की, या अभ्यासक्रमाद्वारे ऊर्जा विकास, क्षमता वृद्धी,
आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, नेतृत्वगुण यांचा विकास घडविला जातो. तसेच जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे
जाऊन यश मिळविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरतो. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम
आयोजित केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण
अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे आणि डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले
सूत्रसंचालन व आभार डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले, तर अनुराग कोंडे यांनी प्रशिक्षक श्री. श्रीकांत पंडित यांचा परिचय करून दिला. या अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या परभणी मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांसह कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील एकूण २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.





