सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ.
प्रवीण वैद्य आणि सहाय्यक लेखाधिकारी श्री. मोहम्मद यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील शेतकरी बांधव मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी कृषि विद्यापीठ हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
संशोधन व विस्तार कार्यातून विकसित होणारे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषि
क्षेत्रात पाण्याचे महत्व अधोरेखित करताना त्यांनी शेतीमध्ये पाण्याची बचत व
संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब
करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा, असेही
त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी शेतकऱ्यांनी तुषार
सिंचन,
ठिबक सिंचन तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या
वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात वाढ साधावी, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व्यवस्थापन संशोधन
प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी केले. त्यांनी प्रकल्पांतर्गत
राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व संशोधन कार्याची माहिती दिली. या उपक्रमाच्या
माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात
आले.
अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत लिंगापूर (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील
ग्रामसभेकडून निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या हस्ते १० तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यापीठाची कृषि
दैनंदिनीही शेतकऱ्यांना देण्यात आली.
यावेळी डॉ. सुमंत जाधव (विभाग प्रमुख) व डॉ. विशाल इंगळे
(सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग) यांनी तुषार सिंचन संचाचा योग्य वापर, निगा व देखभाल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी बचत
तंत्रज्ञानाचा अधिक लाभ होणार असून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.


