Wednesday, March 25, 2026

वनामकृविच्या धाराशिव येथील कृषि महाविद्यालयाच्या नवीन विहिरीचे मान्यवरांचा शुभहस्ते जलपूजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय धाराशिव येथील प्रक्षेत्रावर जिल्हा नियोजन व विकास समिती, धाराशिव यांच्या निधीतून नव्याने खोदण्यात आलेल्या विहिरीचे जलपूजन कार्यक्रम दिनांक २५ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पूजार (भा.प्र.से.) यांनी उपस्थिती होती.

यावेळी विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, मृद विज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकार, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. राजकुमार मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पुंडलिक गोडसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. हेमंत नागदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शिवराम केत तसेच प्लॅन्टेरा (Professor of Practice) चे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजयकुमार चोले आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी विहीर खोदकाम, संग्रहालय (Museum) व इनक्युबेशन सेंटरच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत मिळालेल्या अर्थसाहाय्याबद्दल आभार व्यक्त केले.

प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पूजार यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या भविष्यातील विकासासाठी आवश्यक त्या सुविधा व प्रकल्पांसाठी पुढेही अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाची प्रस्तावना सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिगंबर पेरके यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. महेश वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब बडगिरे यांनी केले.