Friday, March 13, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ६१ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

पदोन्नतीमुळे विद्यापीठात आनंदाचे वातावरण ; अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानले आभार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२५–२६ या पदोन्नती वर्षात विविध संवर्गांमध्ये पदोन्नती देण्यात आली असून एकूण ६१ कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. या पदोन्नतीचे आदेश विद्यापीठाद्वारे नुकतेच देण्यात आले असून त्यामुळे विद्यापीठात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदोन्नतीची प्रक्रिया माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.

विद्यापीठातील मंजूर पदांपैकी सुमारे ६० टक्के पदे रिक्त असल्याने शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यावर परिणाम होत असून कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पदोन्नती प्रक्रियेद्वारे काही पदे भरून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या पदोन्नतीमध्ये प्रशासन, शिक्षण, संशोधन व विस्तार विभागातील विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दीर्घकाळ प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या तसेच शैक्षणिक पात्रता व सेवाज्येष्ठता असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना वरिष्ठ पदांवर पदोन्नती देण्यात आली.

प्रशासकीय संवर्गामध्ये एकूण २३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील ४ जणांना कक्ष अधिकारी पदावर, वरिष्ठ लिपिक संवर्गातील ५ जणांना सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर, कनिष्ठ लिपिक संवर्गातील ९ जणांना वरिष्ठ लिपिक पदावर, तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधील ४ जणांना कनिष्ठ लिपिक पदावर आणि १ जणाला ग्रंथालय सहाय्यक पदावर पदोन्नती देण्यात आली.

तसेच कार्यासन व तांत्रिक संवर्गातील एकूण ३८ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यामध्ये १३ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ संशोधन सहाय्यक, १८ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ संशोधन सहाय्यक, ३ कर्मचाऱ्यांना कृषि सहाय्यक, १ कर्मचाऱ्यास वरिष्ठ यांत्रिक आणि २ जणांना वाहन चालक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

पदोन्नती मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, उपकुलसचिव श्री. पुरभा काळे, सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे तसेच माननीय कुलगुरू यांचे खाजगी सचिव श्री. बी. आर. डोईजड उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, विद्यापीठात मनुष्यबळाची कमतरता असताना मिळालेली पदोन्नती ही एक महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे स्वतःच्या हितासह विद्यापीठाचे हित जपत शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात अधिक जबाबदारीने व समर्पणाने काम करावे. त्यांनी सर्व पदोन्नती झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत नवीन पदाची जबाबदारी स्वीकारून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनीही पदोन्नती ही विश्वासाची पावती असल्याचे सांगत मिळालेल्या संधीचे सोने करून पूर्ण जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पदोन्नतीची प्रक्रिया कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकुलसचिव श्री. पुरभा काळे, सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे तसेच कुलसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली.

या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण व नवचैतन्य निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेतही वाढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त करत अधिक जबाबदारीने काम करून विद्यापीठाच्या प्रगतीत योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. सहकाऱ्यांनीही पदोन्नती मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.