Wednesday, March 18, 2026

वनामकृवितील दीर्घकालीन खतप्रयोग प्रकल्पाला प्रकल्प समन्वयक डॉ. आर. एच. वंजारी यांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन खतप्रयोग प्रकल्पास भारतीय मृद विज्ञान संस्था, भोपाळ येथील माननीय प्रकल्प समन्वयक डॉ. आर. एच. वंजारी यांनी दिनांक १७ मार्च २०२६ रोजी भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी माननीय कुलगुरूनी जागतिक स्तरावरील दीर्घकालीन खतप्रयोग संशोधनाशी तुलना करून जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.

डॉ. आर. एच. वंजारी यांनी दीर्घकालीन खतप्रयोगाच्या अनुषंगाने सेंद्रिय व अजैविक खतांच्या परिणामांचा मृदा आरोग्य व पिकांच्या उत्पादकतेवर होणारा प्रभाव अभ्यासला. विशेषतः मागील दोन दशकांतील पीक चक्रातील बदल व त्याचे परिणाम यावर त्यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी मृदेमधील कार्बन साठवणूक व कार्बन क्रेडिटच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमास मृद विज्ञान विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, दीर्घकालीन खतप्रयोग प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे, तसेच डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. जावेद जानी यांच्यासह पदव्युत्तर व पीएच.डी. विद्यार्थी उपस्थित होते.

शेवटी, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  आणि माननीय डॉ. आर. एच. वंजारी यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे संशोधन कार्याला नवी दिशा मिळणार असून, भविष्यातील अभ्यासासाठी ही भेट उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.