वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या संयुक्त
विद्यमाने आयओटी (IoT) आधारित स्मार्ट हायड्रोपोनिक प्रणालीचे उद्घाटन नाहेप
प्रकल्पांतर्गत दि. १३ मार्च २०२६ रोजी माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार,
सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके आणि हायड्रोपोनिक प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुमंत जाधव उपस्थित होते.
आधुनिक, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित शेतीला प्रोत्साहन
देण्याच्या उद्देशाने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
यावेळी मार्गदर्शन
करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि
क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आयओटी
(IoT) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक
कार्यक्षम व उत्पादनक्षम होऊ शकते, असे त्यांनी नमूद
केले.
हायड्रोपोनिक ही
मातीविना पिके उगवण्याची आधुनिक पद्धत असून त्यामध्ये पोषक द्रव्यांनी समृद्ध
पाण्याचा वापर केला जातो. आयओटी (IoT) तंत्रज्ञानाशी जोडल्यामुळे तापमान, आर्द्रता,
सामू (pH) पातळी, पोषक
द्रव्यांचे प्रमाण तसेच पाण्याची पातळी यांसारख्या घटकांचे सेन्सरद्वारे निरीक्षण
करून त्यांचे नियंत्रण दूरस्थ पद्धतीने करता येते. या प्रकल्पामध्ये लेट्युस,
पालक, केसर आदी पिकांचे उत्पादन घेता येते.
या प्रणालीमध्ये
सेन्सर्स,
मायक्रोकंट्रोलर आणि क्लाऊड-आधारित मॉनिटरिंगचा वापर करण्यात आला
आहे. सेन्सर्सद्वारे मिळणारी माहिती रिअल-टाइममध्ये पाहता येते आणि त्यानुसार पंप,
लाईट्स तसेच पोषक द्रव्यांचा पुरवठा स्वयंचलितपणे नियंत्रित करता
येतो. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते तसेच
पाणी व इतर संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो.
या प्रकल्पात पदव्युत्तर
विद्यार्थीनी सोनियाश्री तसेच कृषि अभियांत्रिकी पदवीच्या आठव्या सत्रातील समर्थ
असुतकर,
दीपक झगरे, शुभांगी गमे, उषादेवी कोताले आणि वैष्णवी सवंडकर हे विद्यार्थी संशोधन करत आहेत. या
प्रकल्पामध्ये लेट्युस पिकावर प्रकाश किरणांचा परिणाम, अन्नद्रव्य
व्यवस्थापन, तापमान व आर्द्रता या घटकांचा अभ्यास करण्यात
येत आहे.
यावेळी
विद्यार्थ्यांनी स्मार्ट हायड्रोपोनिक प्रणालीचे प्रात्यक्षिक सादर करून मर्यादित
जागेतही पिकांची लागवड कशी करता येते, हे दाखवून दिले. या
तंत्रज्ञानामुळे शहरी शेती, पाणीटंचाई आणि अन्नसुरक्षा
यांसारख्या समस्यांवर उपाय शोधता येऊ शकतील, असेही त्यांनी
सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन
डॉ. विशाल इंगळे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. विवेकानंद भोसले, डॉ.
रघुनाथ जायभाये, डॉ. कलालबंडी, डॉ.
प्रवीण कापसे, डॉ. मधुकर मोरे, डॉ.
सुभाष विखे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ.
अनिकेत वाईकर, शंकर शिवणकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
ही
प्रणाली स्मार्ट शेती व नाविन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या
दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

