सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रशिक्षणासाठी वनामकृवि, परभणी येथे दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच कृषि तंत्रज्ञान
व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), परभणी यांच्या संयुक्त
विद्यमाने दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा
कार्यक्रम दि. २४ ते २५ मार्च २०२६ दरम्यान पार पडत असून, उद्घाटन
समारंभ दि. २४ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील
सभागृह क्र. १८ येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे तसेच प्रकल्प उपसंचालक (आत्मा)
श्री. अभिषेक घोडके, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर,
प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. श्रद्धा
धुरगुडे, डॉ. पपिता गौरखेडे आणि प्रगतशील शेतकरी श्री.
रामराव निळे, श्री. कृष्णा गव्हाणे, श्री.
प्रतापराव काळे, श्री. गोविंदराव दुधाटे हे उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व, रासायनिक
शेतीचे दुष्परिणाम आणि शाश्वत शेती पद्धती याविषयी सविस्तर माहिती अधिकाधिक
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी मार्गदर्शन करताना
सांगितले की, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक
झाल्यामुळे अन्नातील अवशेष वाढून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. तसेच
माती, पाणी व पर्यावरणाचे प्रदूषण वाढत असून जमिनीची सुपीकता
घटत आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी “वन हेल्थ” (One Health) या संकल्पनेवर विशेष भर दिला. मानव, प्राणी, जमीन, वनस्पती आणि पर्यावरण यांच्या आरोग्याचा
परस्परसंबंध लक्षात घेऊन सर्वांगीण आरोग्य जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
निरोगी मातीमुळे निरोगी पिके व दर्जेदार अन्न तयार होते आणि त्यामुळे मानवी आरोग्य
सुधारते,
यामुळे शेतकरीच जगाच्या आरोग्याचे रक्षक आहेत असे त्यांनी नमूद केले. तसेच
रासायनिक शेतीमुळे उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांचा नफा कमी होत असल्याचेही
त्यांनी सांगितले. याउलट नैसर्गिक शेती पद्धतीत कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य असून
जमिनीची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळूहळू रासायनिक शेतीचा वापर कमी
करून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे व प्रशिक्षण
समन्वयक डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिके, तांत्रिक सत्रे व चर्चासत्रांद्वारे मार्गदर्शन केले जाणार असून मराठवाडा विभागातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीबाबत जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास माननीय कुलगुरूंनी व्यक्त केला.
.jpeg)


.jpeg)

