Friday, March 6, 2026

करडई पिकाच्या उत्पादनाबरोबर तेलाच्या प्रमाणालाही महत्त्व देणे आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविद्वारा करडई शेती दिन व विचारमंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत करडई शेती दिन व विचारमंथन कार्यक्रम दिनांक ६ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

विचारमंथन सत्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या हवामान परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी सुधारित वाण, शास्त्रोक्त पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊन शेती अधिक लाभदायक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.तसेच करडई पिकाच्या उत्पादनाबरोबरच त्यातील तेलाच्या प्रमाणाला महत्त्व देण्यावर विशेष भर दिला. करडई हे आरोग्यदायी तेलबिया पीक असून त्याच्या मूल्यवर्धन व बाजारपेठेच्या संधी वाढविण्यासाठी संशोधन, प्रक्रिया व विपणन यांना चालना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

प्रमुख पाहुणे भाकृअपच्या हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे (ICAR–Indian Institute of Oilseeds Research) माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर हे होते, त्यांनी महाराष्ट्रात करडई पिकाचे क्षेत्रविस्तार व उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

या विचारमंथन कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. बी. डी. आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच डॉ. हिराकांत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळच्या सत्रात शास्त्रज्ञांनी डीबीटी प्रकल्प तसेच ८०० पेक्षा अधिक करडई जर्मप्लाझम ट्रायल्सना भेट देऊन विविध वाणांची पाहणी केली. यावेळी भाकृअपच्या हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे (ICAR–Indian Institute of Oilseeds Research) माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर यांनी भेट दिली. या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संशोधन संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, तेलबिया संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. कादिर वेल, डॉ. आर. डी. प्रसाद, डॉ. जी. डी. सतीश कुमार, डॉ. बी. एन. मोटागी (कर्नाटक), महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. एच. जे. राजपूत व डॉ. संदीप दिघुके यांनीही सहभाग नोंदविला.

यानंतर केंद्रीय शेतावर राबविण्यात येत असलेल्या २५० एकर करडई बीज उत्पादन कार्यक्रमाला शास्त्रज्ञांनी भेट दिली. यावेळी मनोली, जांब, वालूर व सोनना (जि. परभणी) येथील सुमारे ५० शेतकरी उपस्थित होते. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून करडई पिकाच्या सुधारित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

शेतकरी–शास्त्रज्ञ संवादादरम्यान डॉ. संतोष शिंदे यांनी शेतकऱ्यांना करडई उत्पादनातील अडचणींबाबत मार्गदर्शन करून त्यांचे निरसन केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धूतमल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एस. ए. शिंदे, डॉ. व्ही. आर. घुगे, डॉ. एस. व्ही. वाघमारे, श्री. व्ही. एम. पांचाळ, डॉ. स्नेहल शिलेवंत व श्री. एम. आर. मगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. आर. आर. धूतमल यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. फरिया खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष शिंदे यांनी मानले.