माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. कौसडीकर यांचे केले अभिनंदन
नवी
दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR-
Indian Council of Agricultural Research) या देशातील सर्वोच्च कृषि
संशोधन संस्थेच्या जनरल बॉडीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद
विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कृष्णराव कौसडीकर यांची शास्त्रज्ञ सदस्य
म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ९ मार्च २०२६ ते ८ मार्च २०२९
असा तीन वर्षांचा राहणार आहे.
भारतीय
कृषि संशोधन परिषद (ICAR) सोसायटीची
जनरल बॉडी ही परिषदेची सर्वोच्च संस्था असून तिचे अध्यक्ष केंद्रीय कृषि व शेतकरी
कल्याण मंत्री असतात. या संस्थेमध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, नामवंत शास्त्रज्ञ तसेच शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश असतो. देशातील कृषि
शिक्षण, संशोधन आणि धोरणात्मक नियोजनास दिशा देणे, प्रगतीचा आढावा घेणे आणि भावी धोरणे निश्चित करणे ही या संस्थेची प्रमुख
जबाबदारी आहे.
या
निवडीबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. कौसडीकर
यांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश आहिरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ.
हरिहर कौसडीकर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी येथे संशोधन उपसंचालक तसेच मृदविज्ञान विभागात प्राध्यापक व
विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कृषि शिक्षण, संशोधन,
नियोजन, व्यवस्थापन तसेच कृषि विस्तार
क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची दखल घेऊन भारत सरकारने देशातील ७४ कृषि
विद्यापीठांमधून त्यांची या महत्त्वपूर्ण समितीवर निवड केली आहे. कृषि परिषद,
पुणे येथे कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार
शिक्षण विभागाच्या संचालक पदाचा त्यांना अनुभव आहे. तसेच कृषि विद्यापीठातील
मृदविज्ञान विषयक शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रातील
त्यांच्या कार्याचा देशातील कृषि शिक्षण व संशोधनाच्या विकासासाठी निश्चितच उपयोग
होणार असल्याचे मानले जात आहे.
डॉ. कौसडीकर यांची ही निवड महाराष्ट्र राज्य आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
.png)