Tuesday, March 10, 2026

मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींनी ड्रोन तंत्रज्ञानाविषयी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) यांचे मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या विषयावरील २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (हिवाळी शाळा) दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

या प्रशिक्षणार्थींना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नवोन्मेषाला चालना देणारे आणि शाश्वत कृषि विकासासाठी उपयुक्त ड्रोन तंत्रज्ञान” (Drone Technologies for Driving Innovation and Sustainable Agriculture) या विषयावर दिनांक १० मार्च २०२६ रोजी मार्गदर्शन केले.

माननीय कुलगुरूंनी कृषि क्षेत्राचा विकास होण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योजक आणि शासन (एआयजी – AIG) यांच्यातील समन्वय अत्यावश्यक असल्याचे सांगितले. या समन्वयातून शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञान व अवजारांचे संशोधन व विकास केला जातो. त्यानंतर शासनाच्या प्रोत्साहनातून आणि उद्योजकतेच्या माध्यमातून त्या तंत्रज्ञानाचे उत्पादन व प्रसार वाढविता येतो. कोणत्याही तंत्रज्ञानाचे प्रभावी व्यापारीकरण करण्यासाठी एआयजी मॉडेल अत्यंत उपयुक्त ठरते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी भारतीय कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कार्य करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान व्यक्त केला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून या कार्यात सहभागी होता आले, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञानासाठी आरपीटीओ (RPTO) केंद्राच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. यासोबतच विविध संस्थांशी सामंजस्य करार करून ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी ड्रोनचे विविध उपयोग तसेच पिकांमध्ये ड्रोनच्या वापरामुळे होणारे फायदे प्रयोगांमधील निष्कर्षांच्या आधारे समजावून सांगितले. तसेच ड्रोन तंत्रज्ञानासाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आणि उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.