एकात्मिक खत व्यवस्थापनातून जमिनीचे आरोग्य राखण्याचा डॉ. हरिहर कौसडीकर यांचा सल्ला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय
कृषि विकास योजनेअंतर्गत डफवाडी (ता. जि. परभणी) येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
करण्यात आले. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ मार्च २०२६ रोजी संपन्न झाला.
या प्रशिक्षण शिबिरात उपसंशोधन संचालक व मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग
प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी परिसरातील आंबा,
कांदा, गवार व भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन
वाढविण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया, जैविक खते, सेंद्रिय खते, विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त
खतांचा वापर करून एकात्मिक खत व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष
आंबा बागेत प्रात्यक्षिकाद्वारे जमिनीचे आरोग्य व पीक पोषणासंबंधी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या
विविध समस्यांचे निराकरणही करून दाखविले. तसेच त्यांनी डफवाडी व उमरी माळ्याची (ता.
परभणी) परिसरातील सहभागी शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या सेवा व उपलब्ध कृषि निविष्ठांविषयी
माहिती देऊन शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाच्या अधिकाधिक संपर्कात राहावे, असे आवाहन केले.
मृद विज्ञान विभागातील दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे
यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना तसेच प्रशिक्षण शिबिराचा उद्देश स्पष्ट करत रासायनिक
खतांच्या अति वापराचा जमिनीवर होणारा परिणाम आणि पिकांची उत्पादकता याविषयी मार्गदर्शन
केले. त्यांनी रासायनिक खतांचा संतुलित व मर्यादित वापर,
माती परीक्षण आणि जैविक खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता
निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात विद्राव्य खते,
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते, सेंद्रिय खते व जैविक
खतांच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यापीठाद्वारे उत्पादित जैविक
खत एनपीके कन्सोरशियम, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते व विद्राव्य
खतांचे प्रतिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना वितरणही करण्यात आले. यावेळी माती परीक्षण,
विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खतांचा
योग्य वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
हे शेतकरी प्रशिक्षण शिबिर श्री. नागोराव कांबळे यांच्या शेतावर आयोजित करण्यात
आले होते. शिबिरात शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून फळझाडे व भाजीपाला पिकांतील पोषण
व्यवस्थापनासंबंधी समस्यांचे निराकरण करून घेतले. यामध्ये प्रताप नामदेव कांबळे,
सिद्धार्थ नागोराव कांबळे, नागोराव शंकर कांबळे,
शेख मंजूर शेख अलाउद्दीन, शेख मुश्ताक शेख मंजूर,
अन्सार खा अकबर खा, भास्कर साळवे, विकास माने, तुळशीराम मस्के, नारायण
मस्के, रामभाऊ मस्के, सीताराम मस्के,
प्रविण संभाजी कांबळे, सचिन नारायण कांबळे,
ज्ञानोबा कोंडिबा कांबळे, अंकुश पारतकर आदींसह
परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

.jpeg)

