फुलशेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मोठी संधी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील
उद्यानविद्या विभागामार्फत ८ एकर क्षेत्रावर विविध फुलपिकांची लागवड करून फुलपिक
संशोधन व व्यावसायिक फुलशेती उपक्रमास दिनांक २५ मार्च २०२६ रोजी माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते प्रारंभ करण्यात आला.
या
उपक्रमांतर्गत झेंडू, गलांडा (गेलार्डिया),
अॅस्टर, गुलछडी, निशिगंध,
शेवंती आणि गुलाब यांसारख्या विविध फुलपिकांची लागवड करण्यात आली
आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत पॉलीहाऊस व शेडनेटमध्ये गुलाबाच्या १०
उत्कृष्ट वाणांची लागवड करण्यात आली आहे.
या
कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विभाग
प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश कदम,
डॉ. हिराकांत काळपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी
मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी फुलशेती ही
शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीचा एक प्रभावी व शाश्वत पर्याय असल्याचे अधोरेखित केले.
मराठवाडा विभागातील अनुकूल हवामान व बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेता
फुलपिकांच्या लागवडीला मोठा वाव असून,
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत फुलशेतीकडे वळण्याची गरज त्यांनी
व्यक्त केली.
तसेच
संशोधनाधिष्ठित शेतीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, अचूक सिंचन
पद्धती व कीड-रोग व्यवस्थापन यांचा अवलंब केल्यास उत्पादनात व गुणवत्तेत लक्षणीय
वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल, असे
त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच मूल्यवर्धन, साठवण व विपणन
साखळी मजबूत करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला.
उद्यानविद्या
विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी सांगितले की, या फुलपिकांवर आचार्य (Ph.D.), पदव्युत्तर (PG) व पदवी (UG) स्तरावरील
विद्यार्थी संशोधन करणार असून यामुळे फुलशेती क्षेत्रात नवे तंत्रज्ञान विकसित
होण्यास मदत होईल.
यावेळी विभागातील
सर्व प्राध्यापक, कर्मचारी व
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)

