Thursday, March 5, 2026

केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांच्या वाढदिवसानिमित्त वनामकृवि, परभणी येथे “शिव वृक्ष मित्र” विशेष वृक्षारोपण उपक्रम

माननीय ना. श्री. शिवराज सिंह चौहान जी यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


भारताचे केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांच्या वाढदिवसानिमित्त “प्रेम सेवा संकल्प दिवस” म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे “शिव वृक्ष मित्र” वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक ५ मार्च रोजी उत्साहात पार पडला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानविद्या विभाग व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

केंद्रीय कृषिमंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी हे निसर्ग व पर्यावरण संरक्षणाला पवित्र सेवा मानतात आणि दररोज एक वृक्ष लावण्याचा प्रेरणादायी संदेश देतात. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन तसेच पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने उद्यानविद्या विभाग व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्रांगणात देशभरातील विविध संस्थांकडून संकलित करण्यात आलेल्या आंब्याच्या ५५ विविध जातींच्या रोपांचा मातृवृक्ष (मदर ब्लॉक) स्थापन करून वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे भविष्यात उत्कृष्ट गुणवत्तेच्या आंबा वाणांच्या संवर्धन व प्रसारास चालना मिळणार आहे.

याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय कृषि क्षेत्र नवकल्पना, शाश्वतता आणि विकासाच्या दिशेने पुढे जात असल्याचे नमूद केले. त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करत केंद्रीय कृषिमंत्र्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर यश लाभो, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कल्याण व कृषि क्षेत्राची प्रगती अधिक वेगाने होत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हस्ते आंब्याच्या विविध जातींची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर तसेच उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा प्राध्यापक व प्रभारी अधिकारी डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आदी मान्यवरांची यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली तसेच समाजात वृक्षसंवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.