Tuesday, March 17, 2026

मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स प्रशिक्षणात कोरडवाहू शेतीसाठी हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञानावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांचे मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित “शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” या विषयावरील २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (हिवाळी शाळा) दि. २८ फेब्रुवारी २०२६ पासून उत्साहात सुरू आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून, त्यांना मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या बाबतीत अत्याधुनिक व शाश्वत कृषि तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून  दिले जात आहे. या उपक्रमामुळे विविध राज्यांतील शास्त्रज्ञ व कृषि तज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण घडून येत आहे.

दिनांक १७ मार्च २०२६ रोजी या प्रशिक्षणांतर्गत विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी “कोरडवाहू शेतीतील हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान” (Climate Resilient Technologies in Dryland Agriculture) या विषयावर अत्यंत मार्गदर्शक व अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा आढावा घेत, जलसंधारण, मृदसंवर्धन, पीक विविधीकरण, दुष्काळ सहनशील वाणांचा वापर, तसेच अचूक शेती (Precision Farming) यांसारख्या उपाययोजनांवर विशेष भर दिला.

यावेळी त्यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनक्षमतेत वाढ होऊन शेती अधिक शाश्वत व नफा देणारी ठरू शकते. तसेच मायक्रोबायोम आधारित जैव-इनपुट्सचा वापर हा मृदा आरोग्य सुधारण्यासाठी व पर्यावरणपूरक शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींनी विषयाशी संबंधित विविध शंकांचे निरसन करून घेतले. चर्चासत्रामध्ये त्यांनी आपले अनुभव मांडत हवामान बदलाशी सामना करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली. या हिवाळी शाळेमुळे शाश्वत कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार होऊन भविष्यातील कृषि व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आणि उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.