मायक्रोबायोम प्रशिक्षणातून ज्ञानवृद्धी; शिक्षण-संशोधन-विस्तार समन्वयावर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा भर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR)
प्रायोजित “शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम
जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant
Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या विषयावरील २१ दिवसीय हिवाळी शाळेचा समारोप सोहळा दिनांक २० मार्च २०२६
रोजी विद्यापीठाच्या परिसंवाद सभागृहात उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख
पाहुणे म्हणून राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि इम्फाळ येथील केंद्रीय
कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉ. सुभाष पुरी होते.
व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. प्रविण वैद्य, विभाग
प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आदी मान्यवर
उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही विद्यापीठाची
प्रमुख कार्ये असून या सर्वांमध्ये सुसंघटित समन्वय असणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठात
हे कार्य यशस्वीपणे राबविले जात असल्यामुळे त्यांनी तिन्ही संचालकांचे अभिनंदन केले.
विद्यापीठात शिक्षण, संशोधन आणि विस्ताराशी संबंधित अनेक गुणवत्तापूर्ण
उपक्रम राबविले जात आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून मायक्रोबायोम
तंत्रज्ञानावरील सहा राज्यांतील २५ प्रशिक्षणार्थींना या विद्यापीठात प्रशिक्षण देण्यात
आले असून, त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल
त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे आभार मानले. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थींच्या
ज्ञानात आणि दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला असून, त्यांनी नवीन
कल्पना व तंत्रज्ञान आत्मसात केले. मागील २१ दिवसांत प्रशिक्षणार्थींसोबत अनेकदा संवाद
साधताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची झळाळी हेच विद्यापीठाच्या यशाचे खरे
प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षणाविषयी बोलताना त्यांनी पिक संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सध्या
वाढते शहरीकरण, अन्नसुरक्षा, पाणीटंचाई
आणि हवामान बदल यांसारख्या समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. मात्र, कृषि आणि अवकाश विज्ञान क्षेत्रात भारताने उच्च दर्जाचे कार्य केले असून,
त्यामुळे आपण अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी झालो आहोत. या प्रगतीत आणखी
वाढ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
एआयजी (AIG) मॉडेलचे विश्लेषण करताना त्यांनी शिक्षण,
उद्योग आणि शास्त्रज्ञ यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट
केले. तसेच उत्पादनात सातत्य राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेवटी, प्रशिक्षण संपल्यानंतरही कोणतीही मदत हवी असल्यास विद्यापीठाशी
संपर्क साधण्याचे आवाहन करून त्यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यापीठात आयसीएआर,
सीएम फंड, आरकेव्हीवाय आणि डीएसटी यांच्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणावर संशोधनासाठी निधी उपलब्ध झाला असून, त्याद्वारे
मृदा संरक्षण, पीक संरक्षण, शिक्षण,
विविध तंत्रज्ञान आणि विस्तार कार्यावर विशेष भर दिला जात आहे. यामुळे
विद्यापीठात अनेक प्रकल्प मंजूर होत असून, भारतीय कृषि अनुसंधान
परिषदेच्या मानांकनात विद्यापीठास ‘अ’ दर्जा प्राप्त झालेला आहे, असे त्यांनी प्रतिपादन
केले.
प्रमुख पाहुणे माननीय डॉ. सुभाष पुरी यांनी आपल्या भाषणात शिक्षण ही अखंड
चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. ज्ञानाची सतत उजळणी व अद्ययावतता आवश्यक
असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रशिक्षणामुळे सहा राज्यांतील २५
प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून त्याचा उपयोग पिकांची प्रतिकारशक्ती
वाढविणे व उत्पादनवाढीसाठी होईल, असे त्यांनी
सांगितले. जैविक कीड नियंत्रण व बायो-एजंट तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आंतरशाखीय
दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी प्रशिक्षणाचे उच्च दर्जाचे नियोजन
केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्षात
वापरण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अभ्यासिका समन्वयक डॉ. गजेंद्र जगताप यांनी
प्रस्तावना सादर करताना प्रशिक्षणाची पार्श्वभूमी मांडली. मागील २१ दिवसांत
व्याख्याने, प्रक्षेत्र भेटी, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आणि कार्यशाळांच्या
माध्यमातून प्रशिक्षणार्थींना मायक्रोबायोम विषयक सखोल ज्ञान देण्यात आल्याचे
त्यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थींनी १९ व्या दिवशी केलेल्या सादरीकरणामुळे
त्यांच्या ज्ञानात उल्लेखनीय वाढ झाल्याचे दिसून आले, असेही
त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षणार्थी डॉ. सौंदरा राजन (विभाग प्रमुख, केंद्रीय कॉफी संशोधन संस्था,
चिकमगळूर, कर्नाटक) यांनी आपल्या मनोगतात ३७ हून अधिक व्याख्याने व प्रक्षेत्र
भेटी ज्ञानवर्धक ठरल्याचे सांगितले. तसेच त्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजकांनी दिलेल्या उत्तम आदरातिथ्याबद्दल
त्यांनी आभार मानले. याबरोबरच डॉ. आर. एस. डावरे (विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र
वाशीम) व डॉ. दिव्या राणी (शास्त्रज्ञ, आरएआरएस, तेलंगणा) यांनीही ड्रोन
तंत्रज्ञान व इम्पॅक्ट अॅनालिसिससह सर्व व्याख्यानांचे कौतुक केले.
प्रशिक्षणार्थ्यांच्या चार गटांमधून सादरीकरण स्पर्धा दिनांक १८ मार्च रोजी
आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गट ‘अ’ ला प्रथम क्रमांक मिळाला. या गटामध्ये
डॉ. सौरभ पद्मशाली, डॉ. व्ही. पी. अग्रवाल, डॉ. एन. एस. उयके, डॉ. प्रीतम भुतडा व डॉ. एस. ए. शिंदे
यांचा सहभाग होता. तर गट ‘डी’ हा उपविजेता ठरला. या गटामध्ये डॉ. एम ए खान, डॉ. श्रुती
के., डॉ. पी. ए. मगरे, डॉ. बी. आर. गजभिये
व डॉ. एस. जी. शिंदे यांचा सहभाग होता.
समारोप कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. नीता गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत
काळपांडे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. सचिन
मोरे, शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांसह सर्व प्रशिक्षणार्थी
उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले, तर आभार डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी मानले. समारोप कार्यक्रमास
विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, शास्त्रज्ञ व सर्व
प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, डॉ. एस. एल. बडगुजर, डॉ. विक्रम
घोळवे, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. अनंत
दौंडे, डॉ. एम. एस. दडके, श्री. कपिल निर्वळ आदींनी विशेष
परिश्रम घेतले.
.jpeg)
अभ्यासक्रम उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर
प्रशिक्षणार्थी डॉ. सौंदरा राजन
प्रशिक्षणार्थी डॉ. दिव्या राणी
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठीचा चमू


.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)