Tuesday, March 31, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर उत्साहात संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष शिबिर २०२५-२६ मौजे मुरूंबा, जि. परभणी येथे दिनांक ३० मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले. “युवा शक्तीचा ध्यास – गावाचा विकास” या संकल्पनेवर आधारित या शिबिरात स्वयंसेवकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून गावविकासासाठी मोलाचे योगदान दिले.

शिबिराचे उद्घाटन सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. टी. रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले. यावेळी डॉ. सुमंत जाधव, डॉ. जी. यू. शिंदे, डॉ. आर. व्ही. शिंदे, डॉ. संजय पवार, डॉ. अनिकेत वायकर, डॉ. गजानन वसु, जि.प. शाळा मुरूंबाचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत कदम, श्री. गुट्टे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. रामभाऊ राऊत तसेच श्री. चोपडे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेची जाणीव ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.

विशेष शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी ग्रामसर्वेक्षण, स्वच्छता अभियान, प्रबोधन रॅली, योग व आरोग्य जनजागृती तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावातील मंदिर परिसर, शाळा व मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिकमुक्त गाव मोहिम राबवून ग्रामस्थांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करण्यात आले.

योग सत्रामध्ये श्री. श्रीधर कारेगावकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत विविध योगासने शिकवली. तसेच अभय देशमुख व उषादेवी कोठाले यांनी आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन करून भूकंप, सर्पदंश व आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना प्रात्यक्षिकासह सादर केल्या. स्वच्छता, नशामुक्ती, पाणी बचत व वृक्षारोपण या विषयांवर पोस्टर तयार करून जनजागृती करण्यात आली.

शिबिराच्या समारोप कार्यक्रमास डॉ. आर. टी. रामटेके, डॉ. मधुकर मोरे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. डी. विखे, श्री. गुट्टे सर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली तसेच तयार केलेले पोस्टर जि.प. प्राथमिक शाळा, मुरूंबा यांना भेट म्हणून देण्यात आले. यावेळी डॉ. रामटेके यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी मधुरा बुचाले, अग्नेस दत्ता, प्रेरणा गंगावणे, गायत्री पाटील, नालिंदे गायत्री, गीता टेंगसे व ऐश्वर्या एम. ए. यांनी गीत सादर करून प्रभावी संदेश दिला. तसेच विद्यार्थी गवळी अभिषेक, प्रफुल्ल पवार, अर्जुन ताठे, अभिषेक कुंडलकर तसेच विद्यार्थिनी साक्षी व ऐश्वर्या यांनी तयार केलेले पोस्टर जि.प. प्राथमिक शाळेला भेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी पिडीयार व विठ्ठल झटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिकेत माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच श्री. प्रमोद राठोड व श्री. हनुमंत ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी रा.से.यो. गीत व राष्ट्रगीताने शिबिराची सांगता करण्यात आली.