“शेतकरी देवो भव:” संदेशातून कृषि क्षेत्रातील आधुनिकतेवर भर – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सलग्न,
नाव्हा (जि. जालना) येथील रंगनाथ महाराज कृषि महाविद्यालयात द्राक्ष
उत्पादक शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी द्राक्ष शेती मार्गदर्शन शिबिर दिनांक १७ मार्च
२०२६ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे प्रमुख पाहुणे होते.
आपल्या
मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि त्यांनी “शेतकरी देवो भव:” हा
संदेश देत कृषि क्षेत्रातील बदलत्या गरजा,
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि राष्ट्रीय कृषि विस्तार शिक्षण
प्रणाली (NAREES) यांची भूमिका स्पष्ट केली. शेतीचे भारतीय
अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी “जीवनदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव” हा नारा दिला. तसेच कृषि विद्यापीठांच्या स्थापनेत
वसंतराव नाईक यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिबिरात
द्राक्ष शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान,
उत्पादनवाढीच्या पद्धती आणि बाजारपेठेतील संधी याबाबत सविस्तर
माहिती देण्यात आली. विद्यापीठाचे मृदा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर
यांनी द्राक्ष उत्पादन वाढीसाठी पंचसूत्री नियोजन व मातीच्या आरोग्याचे महत्त्व
यावर मार्गदर्शन केले. याशिवाय तज्ञांनी द्राक्ष पिकातील रोग, कीड, पाणी व खत व्यवस्थापनाबाबत उपयुक्त माहिती
दिली.
कार्यक्रमादरम्यान
प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी ‘घड कुज’ व ‘साखर उतरणे’ यांसारख्या समस्यांवर
प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांचे शास्त्रोक्त निराकरण केले. काही यशस्वी
द्राक्ष बागायतदारांनी आपले अनुभवही उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. राहुल बोंद्रे होते. यावेळी उपाध्यक्ष श्री.
लक्ष्मणराव कुलकर्णी, कोषाध्यक्ष श्री.
अरुण इंगोले, प्राचार्य डॉ. व्ही. डी. पाटील आदी मान्यवर
उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक करत महाविद्यालयाच्या
प्रगतीचा आढावा घेतला आणि शेतीला विज्ञानाची जोड देऊन उत्पन्न वाढविण्याचे मार्ग
स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा. श्रीधर गडदे यांनी केले,
तर आभार डॉ. एस. आर. पवार यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpeg)

.jpeg)
.jpeg)