Friday, March 13, 2026

वनामकृविच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार

 उत्पादनातील विषमता कमी करण्यासाठी विस्तार उपक्रमांची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राबविण्यात येणारा एक दिवस माझा माझ्या बळीराजा सोबत” हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन आयोजित केला जातो. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संशोधन केंद्रे, कृषि आणि सलग्न महाविद्यालये, विस्तार शिक्षण केंद्रे तसेच कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत दिनांक ११ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या ११ चमूंमधील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह २९ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून सुमारे २७० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालयाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने मौजे मानवत (जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. रमेशराव चौधरी यांच्या शेतावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. या प्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, कृषि विस्तार विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, उद्यानविद्या तज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी तसेच कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविताना ते शेतकरी ते शेतकरी” या पद्धतीने अधिक प्रभावीपणे प्रसारित झाले पाहिजे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक वेगाने होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल. अनेक वेळा एका शेतकऱ्याचे उत्पादन उत्कृष्ट असते, तर त्याच परिसरातील दुसऱ्या शेतकऱ्याचे उत्पादन तुलनेने कमी असते. ही उत्पादनातील विषमता कमी करण्यासाठी विद्यापीठ विविध विस्तार उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्य करत आहे. तसेच येणाऱ्या काळात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीनेही विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी शेती करताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा. विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानांचा तसेच बायोमिक्स, रायझोबियम, पीएसबी यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस निश्चितच मदत होईल.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या विविध समाजमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच येत्या मे महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विद्यापीठाच्या खरीप शेतकरी मेळाव्यास सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

कृषि विस्तार विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी हळद लागवड तंत्रज्ञान तसेच घन पद्धतीने कापूस लागवड या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. उद्यानविद्या तज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या फणस, नारळ, टरबूज व खरबूज लागवडीसंबंधी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी पिकांमध्ये कीड व्यवस्थापन करताना घ्यावयाची काळजी, योग्य कीटकनाशकांचा वापर तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमात परभणी येथील विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि महाविद्यालय (लातूर), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालय, राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, फळ संशोधन केंद्र, बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्र, तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) आणि कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, बदनापूर, खामगाव, तुळजापूर) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यापीठाच्या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस श्रीमती आशाताई भिसे यांचा विशेष सहभाग होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. के. टी. जाधव, डॉ. संजय पाटील, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. सचिन सूर्यवंशी, डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे, डॉ. आशिष बागडे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. विजय भामरे, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. राजेश शेळके, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. एस. डी. सोमवंशी, प्रा. किशोर जगताप, डॉ. तुकेश सुरपाम, प्रा. अशोक निर्वल, दयानंद माने, बिभीषण शिनगारे, जयश्री तवले, डॉ. अनिता साबळे, कृषि विभागाचे श्री. राजकुमार मोरे, डॉ. एस. आर. धांडगे, श्री. अमोल शिंदे, श्री. मोराळे साहेब, श्री. नागेश पाटील, श्री. आनंद नंदनवरे तसेच महाबीजचे श्री. एस. एम. तेलंगे पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.