वनामकृविद्वारा नैसर्गिक शेती व ऊस पाचट व्यवस्थापनावर शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत
खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे दिनांक ६ मार्च २०२६
रोजी ८८ वा शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाईन सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, बीड श्री. सुभाष
साळवे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख,
तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून बारामती येथील भा.कृ.अनु.प.– राष्ट्रीय
अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या शास्त्रज्ञा डॉ. एलीजा प्रधान आणि अंबाजोगाई
येथील कृषि विस्तार विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले
की, नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करणे ही
काळाची गरज आहे. शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके आणि
तणनाशकांचा वापर कमी करून जास्तीत जास्त जैविक निविष्ठांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल आणि जमिनीचे आरोग्यही अबाधित
राहील. यासाठी शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देणे आवश्यक असून या दृष्टीने
विद्यापीठ विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. एलीजा प्रधान यांनी ऊस पिकातील पाचट व
अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची
संख्या कमी होते, सेंद्रिय कर्ब घटतो तसेच पर्यावरणाचे
प्रदूषण होते, असे त्यांनी सांगितले. पाचट न जाळता ते जमिनीत
कुट्टी करून कुजविल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये व सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते,
बाष्पीभवन कमी होते, जमिनीतील ओलावा टिकून राहतो
आणि तणांचे नियंत्रण होते, असे अनेक फायदे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. अरुण गुट्टे यांनी मार्गदर्शन करताना ऊस पाचटाचे महत्त्व तसेच बायोमिक्स
व जैविक खते यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर शेतीची शाश्वतता टिकविण्यासाठी अत्यंत
आवश्यक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड यांनी
प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. कार्यक्रम अत्यंत
उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त करत या विषयावर आणखी कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी अनेक
शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे उपस्थित
तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी दिली.
सूत्रसंचालन डॉ. हनुमान गरुड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भैय्यासाहेब गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा. किशोर जगताप, डॉ. तुकेश सुरपाम, प्रा. गणेश मंडलिक, श्री. दीपक इंगळे, श्री. गजेंद्र आढावे, श्री. दत्तप्रसाद वीर यांच्यासह कृषी विद्यापीठ व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



.jpeg)