महिलांचा सन्मान असलेल्या घरात सुख-समृद्धी नांदते – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
माननीय अँड. वैशाली
डोळस
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय,
परभणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी “महिला : हक्क, न्याय आणि कृती” या विषयावर व्याख्यान
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक १० मार्च २०२६ रोजी
महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख
पाहुण्या म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध व्याख्यात्या माननीय ॲड. वैशाली डोळस
उपस्थित होत्या. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ.
विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश कदम, डॉ.
नीता गायकवाड तसेच शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार आणि सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ.
स्मिता खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांविषयी
आदर व्यक्त करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, भारत देशाच्या घडणीत अनेक थोर महिलांचा
सिंहाचा वाटा आहे आणि आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले मोलाचे योगदान देत आहेत.
कौटुंबिक व सामाजिक पातळीवर महिला आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
जीवनात यशस्वी होण्यासाठी महिलांना अनेकदा पुरुषांपेक्षा अधिक संघर्ष करावा लागतो.
ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान होतो, त्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदते. त्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त
प्रत्येकाने महिलांचा आदर करावा आणि त्यांना शिक्षण व सर्व सोयीसुविधांनी सक्षम
बनवावे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठात पूर्वी अल्पसंख्य
असलेली विद्यार्थिनींची संख्या आता सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली असून
प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुलींचा सहभाग आहे.
त्यामुळे आजची महिला सक्षम व प्रगत आहेत. कार्यालयामध्ये महिला चांगले काम करत
असतील तर त्यांना अधिक जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली पाहिजे. यामुळे त्यांचा
आत्मविश्वास वाढतो आणि त्या आपल्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकतात, असे त्यांनी नमूद
केले.
प्रमुख
पाहुण्या माननीय ॲड. वैशाली डोळस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी शिक्षणाच्या बळावर आत्मविश्वास
वाढवून प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे. समाजातील चुकीच्या प्रथा, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध महिलांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.
महिलांनी आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव ठेवून जबाबदारीने वागले पाहिजे,
असेही त्यांनी नमूद केले. तसेच बालविवाह, लैंगिक
अत्याचार आणि घरगुती हिंसाचार (Domestic Violence) यांसारख्या
सामाजिक समस्यांविरुद्ध समाजाने एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी
सांगितले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक कृषि महाविद्यालयाचे सहयोगी
अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल
माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका नारळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्नेहल शिलेवंत यांनी
केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोदावरी पवार व डॉ. मीनाक्षी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




.jpeg)
.jpeg)
.jpeg)



.jpeg)
.jpeg)