Sunday, March 8, 2026

इएलपी मॉड्यूलला कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; विद्यार्थ्यांना कृषि उद्योजकतेबाबत मार्गदर्शन

 वनामकृवितील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून कोबीवर्गीय व पालेभाज्यांचे दर्जेदार उत्पादन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण कार्यक्रमांतर्गत (ELP – Experiential Learning Programme) पॉलिहाऊस व शेडनेटमध्ये कोबीवर्गीय व पालेभाज्या पिकांचे दर्जेदार उत्पादन घेण्याचा यशस्वी उपक्रम राबविला आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इएलपी (ELP) मॉड्यूल प्रभारी डॉ. अंशुल लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे चालू आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सदर इएलपी (ELP) मॉड्यूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पॉलिहाऊस व शेडनेटमधील पिकांची पाहणी करून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या दर्जेदार उत्पादनाचे कौतुक केले. तसेच उत्पादन व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन, खर्च नियंत्रण आणि प्रभावी विपणन तंत्राचा अवलंब करून या मॉड्यूलमधून अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यात कृषि उद्योजकतेच्या दृष्टीने अशा प्रयोगशील उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी अधिक व्यापक प्रमाणात अवलंब करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत महाविद्यालयामध्ये राबविण्यात येत असलेले इएलपी (ELP) मॉड्यूल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन, व्यवस्थापन व विपणनाचा मौल्यवान अनुभव मिळत असून भविष्यात याच अनुभवाच्या आधारे ते यशस्वी कृषि उद्योजक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कमीत कमी रासायनिक निविष्ठांचा वापर करून पॉलिहाऊस व शेडनेटमध्ये पत्ताकोबी, लालकोबी, फ्लॉवर तसेच विविध पालेभाज्या यांची तांत्रिक पद्धतीने लागवड करून त्यांचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. उत्पादित भाजीपाल्याची विक्री विद्यापीठ परिसर तसेच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्टॉल लावून थेट ग्राहकांना करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लागवडीपासून उत्पादन व्यवस्थापन, काढणी, विक्री व विपणन व्यवस्थापनापर्यंतची प्रत्यक्ष माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती व्यवस्थापन, विपणन कौशल्य आणि भविष्यात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी उपयुक्त अनुभव मिळत आहे.

इएलपी (ELP) मॉड्यूलमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन व्यवस्थापन, आर्थिक नियोजन तसेच ग्राहकांशी थेट संवाद साधण्याचा अनुभव मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वृत्ती विकसित होण्यास मोठी मदत होत आहे. या यशस्वी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी दर्जेदार उत्पादन घेऊन ELP कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले असून हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

सदर उपक्रमास महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचारी वर्गांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.