Saturday, September 19, 2026

वनामकृवितर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा कृती आराखडा

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात शेतकरी सेवा, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, नवोपक्रम व शाश्वत शेतीवर विशेष भर

महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्याचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या संदर्भात विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ सप्टेंबर रोजी ऑनलाइन बैठक घेण्यात आली.

कृषि क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती, जलसंधारण, नवोपक्रम आणि विविध सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यावर या अभियानात विशेष भर देण्यात आला आहे. बैठकीस विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सर्व महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक तसेच विस्तार शिक्षणाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मान्यतेने विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांची ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी विद्यापीठाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अभियानांतर्गत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये संबंधित विभागांच्या समन्वयाने शेतकरी सेवा व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या कृषि योजना, अर्ज प्रक्रिया, सिंचन, ७/१२ व ८-अ अद्ययावत करणे, पीक उत्पादन, कीड व रोग व्यवस्थापन, मृदा व पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.

विद्यार्थी, संशोधक, युवा शेतकरी व कृषि उद्योजक यांच्या सहभागातून कृषि नवोपक्रम व स्टार्टअप उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांवर आधारित नवोपक्रम, कृषि प्रक्रिया व मूल्यवर्धन, डिजिटल कृषि आणि ग्रामीण रोजगारनिर्मितीच्या संधींना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

 ‘सेवा माझे योगदानया संकल्पनेतून परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, जलसंधारण, प्लास्टिकमुक्ती, कचरा वर्गीकरण, महिला आरोग्य आणि डिजिटल साक्षरता यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग राहणार आहे.

पाण्याचा कार्यक्षम वापर, सूक्ष्म सिंचन, पावसाच्या पाण्याचे साठवण, मृद व जलसंधारण तसेच हवामान अनुकूल शेती यावर विशेष भर देऊन प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावभेटी, शेतकरी संवाद, कृषि तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आणि करिअर मार्गदर्शन उपक्रमही राबविले जाणार आहेत.

आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी मेळावे, तंत्रज्ञान प्रदर्शने आणि आधुनिक शेतीवर आधारित कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आधुनिक शेती, कृषि उद्योजकता, हवामान बदल आणि डिजिटल कृषि या विषयांवर व्याख्याने व कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.

याशिवाय विकसित भारत’ संकल्पनेशी संबंधित कृषि विषयांवर विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, पोस्टर, चित्रकला, प्रदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ‘विकसित भारतासाठी कृषि क्षेत्राची भूमिका’, ‘युवा व कृषि नवोपक्रम’ आणि ‘शाश्वत शेती’ या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या संशोधन, विस्तार शिक्षण व कृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे लाभ झालेल्या शेतकऱ्यांच्या बदलाची गोष्ट’ या यशोगाथा संकलित करण्यात येणार आहेत. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याचे नाव व गाव, राबविलेले तंत्रज्ञान किंवा उपक्रम, झालेला सकारात्मक बदल तसेच छायाचित्रे, लघु व्हिडिओ किंवा रील यांचा समावेश केला जाणार आहे.

अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे छायाचित्रे, व्हिडिओ, लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया व संक्षिप्त अहवालाद्वारे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. सर्व उपक्रमांचा संकलित अहवाल शासनाच्या निर्देशानुसार तयार करून विद्यापीठाच्या नोडल अधिकाऱ्याकडे दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून कृषि विद्यापीठातील संशोधन, शिक्षण व विस्तार कार्य शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडून कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार, शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहणार आहे.

बैठक यशस्वी करण्यासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आणि विस्तार शिक्षण संचालनालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.