माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन; नवप्रवेशित विद्यार्थ्यांना संस्कार, संघर्ष आणि सेवाभावी वृत्तीचा संदेश
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत
कृषि महाविद्यालय,
अंबाजोगाई येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी
‘दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या शिक्षण
विभाग, जिमखाना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) यांच्या
संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन
पद्धतीने भूषविले. विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांचीही ऑनलाइन
प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट उपस्थित होते. तसेच अंबाजोगाई शहर पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड आणि तहसीलदार श्री. विलास तरंगे यांची विशेष
उपस्थिती होती.
उद्घाटनपर मार्गदर्शन करताना माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार आत्मसात
करण्याचे आवाहन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवणे आवश्यक
असून, विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग सेवाभावी वृत्तीने शेतकरी
आणि समाजाच्या हितासाठी करावा, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब
ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा
अत्यंत महत्त्वाचा घटक असून, कृषि क्षेत्रातील सुधारणा आणि विकास हाच देशाच्या
सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड यांनी
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी
मोबाईलचा वापर अत्यंत डोळसपणे करावा. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांनी
तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. यासोबतच विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून
कटाक्षाने दूर राहावे,
असे आवाहन त्यांनी केले.
तहसीलदार श्री. विलास तरंगे यांनी विद्यार्थ्यांनी
सजग समाजभान ठेवून तसेच आई-वडिलांच्या अपेक्षा आणि विश्वासाचा विचार करून मनापासून
शिक्षण घ्यावे,
असे सांगितले. पालक आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्याशी आशा-आकांक्षा
जोडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता जबाबदारीने
वाटचाल करावी, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. शिवदास
शिरसाट यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास
निर्माण केला. दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या
बळावर यशाचे शिखर गाठता येते. संघर्ष हाच यशाचा खरा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालक प्रतिनिधी श्री. सुधाकर देशमुख
आणि श्रीमती बालिका मुढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नवप्रवेशित विद्यार्थी
आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि महाविद्यालय, अंबाजोगाईचे
अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड यांनी केले. श्री. राजेश रेवले यांनी काव्यात्मक आणि बहारदार
शैलीत सूत्रसंचालन केले, तर शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ. विजयकुमार
जाधव यांनी आभार मानले.
नवप्रवेशित विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाची
दिशा, सामाजिक जबाबदारी, तंत्रज्ञानाचा सजग वापर आणि संस्कारमूल्यांची
जाणीव करून देणारा हा ‘दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
झाला.

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
