महाराष्ट्र शासनाच्या
कृषी विभागाच्या दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यभर दि. १७
सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प
अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषि विद्यापीठांमार्फत शेतकरी सेवा
व मार्गदर्शन,
कृषि
तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व प्रसार, कृषि नवोपक्रम, सामाजिक उपक्रम, जलसंधारण तसेच
शाश्वत शेतीबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याअनुषंगाने वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
नेतृत्वात आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगाव, ता. जि. परभणी
येथील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यापीठाचे
संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे आणि
डॉ. पपीता गौरखेडे यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. भगवान
असेवार यांनी ‘सेवा संकल्प अभियान’चा उद्देश स्पष्ट करून शाश्वत शेती, जलसंधारण आणि
आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्त्व विशद केले.
बदलत्या हवामान परिस्थितीत उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने व कार्यक्षम वापर
करून शेती अधिक सक्षम आणि शाश्वत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
डॉ. मधुकर मोरे यांनी
उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पाणी अंदाजपत्रक (वॉटर बजेटिंग) तयार करण्याचे
महत्त्व सांगितले. उपलब्ध पाणीसाठा, जमिनीतील ओलावा आणि संभाव्य पर्जन्यमान
यांचा विचार करून रब्बी हंगामातील पिकांची निवड व क्षेत्राचे नियोजन करावे. तसेच उपलब्ध
पाण्याचा कार्यक्षम वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा, असे त्यांनी
सांगितले.
डॉ. पपीता गौरखेडे यांनी
मृद आरोग्य,
मृद
परीक्षण आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. माती परीक्षणाच्या
आधारे खतांचा संतुलित वापर करणे, जमिनीतील सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण वाढविणे
तसेच जमिनीची सुपीकता व उत्पादकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य
व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी
पिकांची सद्यस्थिती, रब्बी हंगामाचे नियोजन, पाण्याची उपलब्धता, मृद आरोग्य, खत व्यवस्थापन
तसेच विविध कृषि तंत्रज्ञानाबाबत प्रश्न विचारले. उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या
विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या समस्यांचे निरसन केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमास
बाभूळगाव येथील श्री. ज्ञानोबा गणपतराव पारधे, श्री. उत्तम
दशरथ दळवी,
श्री.
बाळाभाऊ बाबूराव जमरे, श्री. ज्ञानोबा तुकारामजी पारधे, श्री.
तुळशीराम माणिक पारधे, श्री. रघुनाथ लक्ष्मणराव तुरधने, श्री.
राधाजी पांडुरंग आळशे, श्री. आसाराम सोनाजी कारके आणि श्री. कैलास
बालाजी धुमाळ आदी शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश खटींग आणि अमर राऊत यांनी परिश्रम घेतले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठातील संशोधन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचे शास्त्रीय मार्गदर्शन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, बदलत्या हवामान परिस्थितीत योग्य कृषि निर्णय घेण्यासाठी या उपक्रमाचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
