Wednesday, September 23, 2026

आधुनिक शेतीच्या संधींचा लाभ घेत कौशल्य व संशोधनवृत्ती विकसित करा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 कृषि शिक्षणाच्या नव्या पर्वाला सुरुवात; शासकीय कृषि महाविद्यालय, नांदेड येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ व पालक मेळावा उत्साहात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, नांदेड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा’ उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाला. कृषि शिक्षणाच्या नव्या पर्वात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाची शैक्षणिक परंपरा, उपलब्ध सुविधा, अभ्यासक्रम, संशोधनाच्या संधी तसेच भविष्यातील करिअरच्या विविध वाटांचा परिचय करून देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. त्यांनी आभासी माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, 
 पिपल्स महाविद्यालयाचे प्रा. विनोद चव्हाण, उपकुलसचिव (विद्या) डॉ. गजानन भालेराव, कापूस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजयकुमार चिंचाणे, केळी संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी डॉ. सुजाता धुतराज आणि कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कृषि पदवी ही केवळ नोकरी मिळविण्याचे साधन न राहता ज्ञान, कौशल्य, संशोधन आणि उद्योजकतेच्या माध्यमातून समाज व शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे माध्यम बनले पाहिजे.” विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन करण्यापुरते शिक्षण न घेता विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करून कौशल्यविकास आणि संशोधनवृत्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
आधुनिक शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल शेती, अचूक शेती, हवामान-स्मार्ट शेती, जैवतंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण तसेच मूल्यवर्धन आणि कृषी उद्योजकतेच्या माध्यमातून मोठ्या संधी निर्माण होत आहेत. बदलत्या कृषी क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, प्रयोगशील दृष्टिकोन ठेवावा आणि 'शेतकरी-केंद्रित विचारातून समस्यांचे समाधान शोधणारे कृषि व्यावसायिक’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यापीठातील शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रम, विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रम आणि उपलब्ध संधींची माहिती दिली. महाविद्यालयीन जीवनात शिस्त, वेळेचे नियोजन, नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास तसेच शिक्षकांशी संवाद यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक व संशोधन सुविधांचा अधिकाधिक उपयोग करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ राजेश कदम यांनी महाविद्यालयाच्या उपलब्ध सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन प्रणाली सांगितली. तसेच सर्व प्रवेशीत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून अभ्यासक्रम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. विनोद चव्हाण, डॉ. गजानन भालेराव, डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. सुजाता धुतराज आणि डॉ. संतोष पिल्लेवाड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृषि शिक्षणातील विविध क्षेत्रे, उच्च शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा, संशोधन, विस्तार कार्य, कृषि उद्योग तसेच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कृषि शिक्षणाबाबतच्या आपल्या अपेक्षा व्यक्त करताना भविष्यात कृषि क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे, कृषि उद्योजकता विकसित करणे आणि संशोधनाच्या माध्यमातून योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.
पालकांनीही आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक मार्गदर्शन, सुविधा आणि सकारात्मक वातावरण याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील सातत्यपूर्ण संवादातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक व व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच सकारात्मक दिशा मिळेल, असा सूर यावेळी व्यक्त झाला.
कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रभारी डॉ. रमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रणली बिलेवाड आणि श्री. भावेश जोशी यांनी केले, तर श्री. प्र. वि. कळसकर यांनी आभार प्रदर्शन केले.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या दीक्षारंभ कार्यक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाची व्यापकता, विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरा आणि भविष्यातील संधींची ओळख झाली. ज्ञान, कौशल्य, संशोधन आणि नवोपक्रमाच्या बळावर सक्षम कृषि व्यावसायिक घडविण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.