नूतन कृषीपदवी विद्यार्थ्यांना माजी महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांचे मार्गदर्शन
कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या
रोजगार,
संशोधन, उद्योजकता व स्वयंरोजगाराच्या संधी
उपलब्ध आहेत. या संधींचा शोध घेत असतानाच विद्यार्थ्यांनी कृषीपदवी शिक्षणाच्या
चार वर्षांच्या कालावधीत विषयाचे सखोल व गुणवत्तापूर्ण ज्ञान आत्मसात करण्यावर भर
द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन
परिषदेचे माजी महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर येथील कृषी महाविद्यालय, लिहाखेडी
(हल्ली राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, पैठण रोड येथे
कार्यान्वित) येथे नूतन कृषीपदवी विद्यार्थ्यांसाठी दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित
दीक्षारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ,
परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्षस्थानी
कृषी महाविद्यालय लिहाखेडी-पालोदचे अधिष्ठाता तथा सहयोगी संशोधन संचालक डॉ.
सूर्यकांत पवार होते. यावेळी माजी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. उदय देवळणकर,
कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री. दत्ता मुळे आदी मान्यवर उपस्थित
होते. याच प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘सेवा संकल्प
अभियानाची’ सुरुवात करण्यात आली.
पुढे मार्गदर्शन करताना श्री. भागडे म्हणाले की, कृषिशिक्षण
घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर सेवाक्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी
उपलब्ध आहेत. मात्र, या संधींचा लाभ घेण्यासाठी
विद्यार्थ्यांनी प्रथम कृषीपदवीचे शिक्षण योग्य पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासू मित्र जोडावेत, वरिष्ठ
विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच शैक्षणिक अडचणी शिक्षकांशी मोकळेपणाने
मांडाव्यात. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला
असून प्रात्यक्षिक शिक्षणातून विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न केला
पाहिजे. महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थी अभ्यास कसा करतात, याबाबत जिज्ञासा ठेवून त्यांच्या चांगल्या बाबी आत्मसात कराव्यात. गुणवत्तापूर्ण
शिक्षण घेतल्यास यश मिळतेच, हा माझ्यासह अनेकांचा अनुभव आहे,
असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. सूर्यकांत पवार यांनी
प्रमुख पाहुणे श्री. रावसाहेब भागडे व श्री. उदय देवळणकर यांच्या कृषी क्षेत्रातील
योगदानाचा आदरपूर्वक उल्लेख केला. या कृषी महाविद्यालयास मान्यता मिळवून
देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. संभाजीनगर जिल्ह्याचे
रहिवासी म्हणून या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान
दिल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले.
डॉ. पवार म्हणाले की, सुधारित शैक्षणिक धोरणानुसार
नवीन कृषी अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून त्यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता
विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, काटेकोर शेती आदी आधुनिक विषयांचा
अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. कृषीपदवीधारक विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी
उपलब्ध असून त्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःची योग्यता
विकसित करणे आवश्यक आहे.
आजचे युग स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी सतत चिंतनशील
राहून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे गरजेचे आहे. शेती करणाऱ्या युवकांकडे
कमीपणाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेती करणे ही
अभिमानाची बाब असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीला व्यवसाय व
उद्योजकतेचे स्वरूप देता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयातील शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांना स्वतःच्या
कार्यातून आणि अनुभवातून शिक्षण देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या
मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण
संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान
आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच
विद्यापीठाचे कुलसचिव, नियंत्रक व अभियंता यांच्या
सहकार्यामुळे महाविद्यालयाचे कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. उदय देवळणकर यांनी कृषी विभागातील आपल्या
अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी
संवादकौशल्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून
कृषी क्षेत्रासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच उपलब्ध संधी याबाबतही
त्यांनी माहिती दिली. कृषी हे महत्त्वाचे शिक्षण असून या क्षेत्रात राज्याने अनेक
आदर्श निर्माण केले आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदलत्या
परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील राहावे, असे
आवाहन त्यांनी केले.
डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी कृषी विषयाचे महत्त्व, कृषी
क्षेत्रातील उपलब्ध संधी, मूल्यवर्धन तसेच कृषी क्षेत्रातील
महिलांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिकपणा या गुणांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा
अविभाज्य भाग बनवावे, असे त्यांनी सांगितले.
.jpeg)

.jpeg)
