वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या
मार्गदर्शनाखाली शासकीय कृषी महाविद्यालय व शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन
महाविद्यालय, जिरेवाडी, ता. परळी,
जि. बीड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेशित कृषी पदवी व
कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ समारंभ
दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान होते, तर
प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड
उपस्थित होते. यावेळी कृषी तंत्र विद्यालय, अंबाजोगाईचे
प्राचार्य डॉ. मधुकर खळगे, कृषी महाविद्यालयाचे शिक्षण
विभागप्रमुख डॉ. विनोद शिंदे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन
महाविद्यालयाचे शिक्षण विभागप्रमुख डॉ. योगेश वाघमारे तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ.
गणेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय
समारोपात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान यांनी प्रवेशित
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नवीन आव्हाने व वाढती स्पर्धा यांचा सामना
करताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने प्रगती करावी, असे
त्यांनी सांगितले. कृषी तसेच कृषी व्यवसाय व्यवस्थापन या दोन्ही पदव्यांच्या
माध्यमातून विद्यार्थी भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवू
शकतात, असे त्यांनी नमूद केले. “कृषी
हा देशाचा पाया आहे, तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन हे देशाच्या
प्रगतीचे शिखर आहे,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना
उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख
पाहुणे डॉ. आर. डी. राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषी व कृषी
व्यवसाय व्यवस्थापन पदवीचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरण-२०२० याविषयी
सखोल माहिती दिली. भावी पिढीमध्ये कृषीविषयी आवड व अभिरुची निर्माण होणे आवश्यक
असून, शेती व शेती व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे
त्यांनी सांगितले. देशाच्या प्रगतीमध्ये युवकांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक
प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद
केले.
डॉ. राठोड
यांनी आपल्या मार्गदर्शनात माननीय माजी कृषि मंत्री आणि आमदार श्री धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टी व प्रयत्नांमुळे
कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापनासारखी शासकीय महाविद्यालये परळी येथे स्थापन
झाल्याबद्दल परळीकरांना अभिमान असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या
माध्यमातून व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी येथे स्थापन
झालेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. याबद्दल
त्यांनी महाराष्ट्र शासन व संबंधित मंत्री यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या
प्रारंभी प्रास्ताविक करण्यात आले. त्यानंतर कृषी महाविद्यालयाचे शिक्षण
विभागप्रमुख डॉ. विनोद शिंदे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून कृषी व कृषी व्यवसाय
व्यवस्थापन या पदवी अभ्यासक्रमांची माहिती, परीक्षा पद्धती, महाविद्यालयातील उपस्थितीचे महत्त्व तसेच विविध शैक्षणिक बाबींविषयी
विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रा.
बाबासाहेब मस्के यांनी राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना तसेच भारत सरकार व
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर
माहिती विद्यार्थ्यांना दिली. कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण
विभागप्रमुख डॉ. योगेश वाघमारे यांनी राष्ट्रीय स्तरावर आयसीएआर तसेच राज्य
स्तरावर एमसीएआरमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा व पदव्युत्तर
शिक्षणाच्या संधींबाबत माहिती दिली. तसेच सहकार व व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान
पालकांनी मनोगत व्यक्त करून आपल्या पाल्यांच्या भवितव्याबाबत समाधान व विश्वास
व्यक्त केला. यावर्षी आयसीएआरच्या माध्यमातून बिहार, कर्नाटक व राजस्थान
राज्यांमधूनही काही विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. या
विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी
प्रवेशित विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक डॉ. अमोल मिसाळ, डॉ.
अक्षता शिंदे, डॉ. गिरी, प्रा. शिवाजी
किर्जत, प्रा. स्वप्नाली जाधवर तसेच ग्रंथपाल श्रीमती मोडके
यांची उपस्थिती होती.
.jpeg)
