Thursday, December 27, 2018

कृषि पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्‍प्रेरक बनले पाहिजेत......महासंचालक मा. डॉ त्रिलोचन महापात्र

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बावीसावा दीक्षांत समारंभ उत्‍साहात संपन्‍न
माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी एकुण ३३७६ स्‍नातकांना विविध पदवीने केले अनुग्रहीत  




देशाच्‍या आर्थिक विकासात कृषि व कृषि संलग्‍न क्षेत्राचे मोठे योगदान आहे, स्‍वातंत्र्यानंतर शेतकरी, कृषि शास्‍त्रज्ञ व धोरणकर्ते यांच्‍या परिश्रमातुन कृषि उत्‍पादनात वाढ होऊन देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. गेल्‍या वर्षी देशात २७७ दशलक्ष टन अन्‍नधान्‍याचे उत्‍पादन झाले असुन जगात भात, गहु, दुग्ध, फळे व भाजीपाला, अंडी आदीच्‍या उत्‍पादनात आपण अग्रेसर आहोत. सद्यस्थितीत भारतीय शेती समोर अनेक आव्‍हाने असुन यात जागतिक तापमानवाढ, सतत नैसर्गिक आपत्‍ती, जमिनीचा होणारा -हास, पाण्‍याचे दुर्भिक्ष, शेतमालाच्‍या भावातील अस्थिरता आदी प्रमुख समस्‍या आहेत. कृषि विकासासाठी शेतमालास योग्‍य व शाश्‍वत भाव मिळणे आवश्‍यक असुन शेतीनिगडीत मुलभुत सुविधांचे बळकटीकरण, योग्‍य कृषि तंत्रज्ञान, शेतक-यांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीवर भर द्यावा लागेल. कृषि पदवीधर हे कृषि उद्योजक म्‍हणुन पुढे आले पाहिजेत. देशाच्‍या कृषि विकासात कृषि विद्यापीठातील पदवीधरांनी आपले योगदान देण्‍याची गरज असुन कृषि पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्‍प्रेरक बनले पाहिजे, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक मा. डॉ त्रिलोचन महापात्र यांनी केले़. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक २६ डिसेंबर रोजी आयोजीत २२ वा दीक्षांत समारंभात दीक्षांत अभिभाषण करतांना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष खा मा श्री संजय धोत्रे व राज्‍याचे कृषि, फलोत्‍पादन, दुग्‍धविकास व पणन राज्‍यमंत्री मा.ना.श्री.सदाभाऊ खोत उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते. व्‍यासपीठावर कुलसचिव श्री रणजित पाटील, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. . श्री राहुल पाटील, मा. श्री लिंबाजी भोसले, मा श्री अजय गव्‍हाणे, मा. श्री बालाजी देसाई, मा. श्री शरद हिवाळे, मा. डॉ आदिती सारडा, माजी कुलगुरू डॉ एस एस कदम, डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ व्‍ही के पाटील, डॉ के पी गोरे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ त्रिलोचन महापात्र पुढे म्‍हणाले की, सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे भारत सरकारचे उदिष्‍ट असुन शेती उत्‍पादनक्षम पेक्षा अधिक उत्‍पन्‍नक्षम करण्‍याच्‍या धोरणावर शासनाचा भर आहे. याकरिता फायदेशीर व शाश्‍वत असा एकात्मिक शेती पध्‍दतीचा विकास करावा लागेल. कृषि संशोधनात रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जैवतंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. परभणी कृषि विद्यापीठाने मराठवाडयातील कोरडवाहु शेती विकासाकरिता उपयुक्‍त असे पिकांचे वाण व कृषि तंत्रज्ञानाची निर्मिती केली असुन हे तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहच‍ण्‍यासाठी सक्षम अशी विस्‍तार यंत्रणा निर्माण करावी लागेल. यासाठी कृषि पदवीधरांचे योगदान महत्‍वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
स्‍वागतपर भाषणात कुलगुरू डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने आजपर्यंत विविध पिकांच्‍या १४१ वाण व २५ शेती औजारे विकसित केले असुन ८५० पेक्षा जास्‍त कृषि तंत्रज्ञान शिफारसी दिल्‍या आहेत. मराठवाडयातील शेतक-यांची अनेक दिवसापासुन मागणी असलेला कापसाचा नांदेड-४४ हा वाण महा‍बीजच्‍या मदतीने बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन येणा-या खरिप हंगामात शेतक-यांसाठी हा वाण उपलब्‍ध होणार आहे. तसेच हैद्राबाद येथील अर्ध शुष्‍क उष्‍णकटिंबधीय आंतरराष्‍ट्रीय संशोधन संस्‍थेच्‍या मदतीने लोह व झिंक चे अधिक प्रमाण असणारा देशातील पहिला खरिप ज्‍वारीचा परभणी शक्‍ती जैवसमृध्‍द वाण विद्यापीठाने विकसित केला असुन बाजरी पिकातील एएचबी-१२०० व एएचबी-१२६९ हे जैवसमृध्‍द वाण निर्माण केले आहेत, यामुळे गर्भवती महिला व मुलींमधील कुपोषणावर मात करता येईल. भारतीय कृषि संशोधन परिषदेने नुकतेच विद्यापीठास अधिस्‍वीकृती दिली असुन यामुळे परिषदेकडुन प्राप्‍त होणा-या निधीचा विद्यापीठातील शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करून देशाच्‍या कृषि विकासासाठी अधिक सक्षम व कौशल्‍यपुर्ण मनुष्‍यबळ निर्मितीवर भर देण्‍यात येईल. देशातील विविध भागातील विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यींनी करिता परभणी कृषि विद्यापीठ परिसर अधिक हरित, स्‍वच्‍छ व सुरक्षित करण्‍यास मानस असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केला
सुत्रसंचालन डॉ आशा आर्या व डॉ दयानंद मोरे यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होतेदीक्षांत समारंभात विविध अभ्‍यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके (सुवर्ण मुलामित), रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात आले. समारंभात विविध विद्याशाखेतील एकुण ३३७६ स्‍नातकांना विविध पदवी, पदव्‍युत्‍तर, आचार्य पदवीने माननीय कुलगुरू महोद्यांव्‍दारा अनुग्रहीत करण्‍यात आले. यात आचार्य पदवीचे एकुण ६१ स्‍नातक, पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचे एकुण ३६४ स्‍नातक व पदवी अभ्‍यासक्रमाचे एकुण २९५१ स्‍नातकांचा समावेश होता.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील पदवी अभ्‍यासक्रमातील गोविंदा रॉय शर्मा (कृषि), जे.आरथी (उद्यानविद्या), बलराम यादव (कृषि जैवतंत्रज्ञान), प्रियांका स्‍वामी (गृहविज्ञान), इंद्रजित सिंह (कृषि अभियांत्रिकी), पदमप्रिया निराली (अन्‍नतंत्रज्ञान), मनोहर धोंडकर (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन) आदी विद्यार्थ्‍यांना सुवर्ण पदकांनी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील  श्रीवर्षा जस्‍ती (कृषि), सुप्रिया सिंगम (उद्यानविद्या), टी.अरूणा (गृहविज्ञान), स्‍वेता सोळंके (कृषि अभियांत्रिकी), दिव्‍यांनी शिंदे (अन्‍नतंत्रज्ञान), आरती देशमुख (कृषि जैवतंत्रज्ञान), एल. बांधवी (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन) आदीं विद्यार्थ्‍यीना सुवर्ण पदकांनी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौ‍रविण्‍यात आले
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील के. अविनाश (कृषि), एस. सजना (उद्यानविद्या), सत्‍यवाण भोसले (कृषि जैवतंत्रज्ञान), रेश्‍मा मल्‍लेशी (गृहविज्ञान), पुरण प्रज्ञा जोशी (कृषि अभियांत्रिकी), मुकेश बेलवाल (अन्‍नतंत्रज्ञान), एक के शिवशंकर (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन) आदी विद्यार्थ्‍यीना सुवर्ण पदकांनी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौ‍रविण्‍यात आले. याव्‍यतिरिक्‍त दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदकांचाही समावेश होता.






Monday, December 24, 2018

वनामकृविच्‍या २२ वा दीक्षांत समारंभानिमित्‍त आयोजित पत्रकार परिषद संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणावर आयोजीत करण्‍यात आला असुन यानिमित्त दिनांक २४ डिसेंबर रोजी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्‍न झाली. पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, जिल्‍हा माहिती अधिकारी श्री अनिल आलुरकर, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी मानले. यावेळी शहरातील विविध प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

प्रेस नोट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बावीसावा दीक्षांत समारंभाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणावर आयोजीत करण्‍यात आला असुन समारंभाचे अध्‍यक्षस्‍थान विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे भुषविणार आहेत. समारंभास नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक मा. डॉ त्रिलोचन महापात्र हे उपस्थित राहुन दीक्षांत अभिभाषण करणार असुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. खा. संजय धोत्रे व राज्‍याचे कृषि, फलोत्‍पादन, दुग्‍धविकास व पणन राज्‍यमंत्री मा.ना.श्री. सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत.
सदरिल दीक्षांत समारंभात विविध अभ्‍यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके (सुवर्ण मुलामित), रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात येणार असुन कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल विद्यापीठातील प्राध्‍यापक / संशोधक यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकाने गौरविण्‍यात येणार आहे.
दीक्षांत समारंभात विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विविध विद्याशाखेतील एकुण ३३७६ स्‍नातकांना विविध पदवी, पदव्‍युत्‍तर, आचार्य पदवीने माननीय कुलगुरू महोद्यांव्‍दारा अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. यात आचार्य पदवीचे एकुण ६१ स्‍नातक, पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचे एकुण ३६४ स्‍नातक व पदवी अभ्‍यासक्रमाचे एकुण २९५१ स्‍नातकांचा समावेश राहणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील कृषि पदवी अभ्‍यासक्रमातील गोविंदा रॉय शर्मा, उद्यानविद्या अभ्‍यासक्रमातील जे.आरथी, कृषि जैवतंत्रज्ञान अभ्‍यासक्रमातील बलराम यादव, गृहविज्ञान अभ्‍यासक्रमातील प्रियांका स्‍वामी, कृषि अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमातील इंद्रजित सिंह, अन्‍नतंत्रज्ञान अभ्‍यासक्रमातील पदमप्रिया निराली, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन अभ्‍यासक्रमातील मनोहर धोंडकर आदी पदवी अभ्‍यासक्रमातील विद्यार्थ्‍यी सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील कृषिच्‍या अभ्‍यासक्रमातील श्रीवर्षा जस्‍ती, उद्यानविद्या अभ्‍यासक्रमातील सुप्रिया सिंगम, गृहविज्ञान अभ्‍यासक्रमातील टी.अरूणा, कृषि अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमातील स्‍वेता सोळंके, अन्‍नतंत्रज्ञान अभ्यासक्रमातील दिव्‍यांनी शिंदे, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन अभ्‍यासक्रमातील एल. बांधवी आदीं विद्यार्थ्‍यी पदव्‍युत्‍तर अभ्यासक्रमातुन सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. 
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील कृषि पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील के. अविनाश, उद्यानविद्या अभ्‍यासक्रमातील एस. सजना, कृषि जैवतंत्रज्ञान अभ्‍यासक्रमातील सत्‍यवाण भोसले, गृहविज्ञान अभ्‍यासक्रमातील रेश्‍मा मल्‍लेशी, कृषि अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमातील पुरण प्रज्ञा जोशी, अन्‍नतंत्रज्ञान अभ्‍यासक्रमातील मुकेश बेलवेल, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन अभ्‍यासक्रमातील एक के शिवशंकर आदी विद्यार्थ्‍यी सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. याव्‍यतिरिक्‍त दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदकांचाही समावेश राहणार आहे.

Wednesday, December 12, 2018

गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीनेच व्यवस्थापन करणे आवश्यक.... कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न
नांदेड: पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चालू हंगामातील कापसाची फरदड शेतक-यांनी घेऊ नये. बोंडअळीच्‍या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीनेच व्यवस्थापन करणे आवश्यक असल्‍याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्‍या वतीने दिनांक ९ डिसेंबर रोजी आयोजित कापूस फरदड निर्मुलन कार्यशाळेच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेस संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपविभागीय कृषि अधिकारी श्री बाळासाहेब कदम, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्हणाले कि, बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनाकरिता शेतक-यांनी घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करावा, किडींना प्रतिकारक्षम विविध वाण व तंत्रज्ञानाचा तूलनात्मक अभ्यास करावा, प्राप्त ज्ञान अन्य शेतक-यांपर्यंत पोहोचवावे. यावर्षी खरीप हंगामात कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या समन्वयाने गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहीमेमुळे शेतक-यांच्या फवारणी खर्चात निश्चितच बचत झाली आहे. यापुढेही शेतक-यांच्‍या अडचणी सोडविण्यासाठी कृषि विद्यापीठ सदैव तत्पर राहील अशी ग्वाही त्‍यांनी यावेळी दिली.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, नांदेड येथील संशोधन केंद्र कापूस पिकावरील संशोधनात नेहमीच अग्रेसर असुन या केंद्राने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव राज्यात होण्यापूर्वीच प्रादुर्भावाचे पुर्वसंकेत व त्यावरील उपाययोजने बाबतची तांत्रिक माहिती दिली होती. सध्या कापसाची प-हाटी शेताबाहेर काढून नष्ट करण्यासाठी जनजागृती करणे अनिवार्य असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
चालू वर्षात जुलै व ऑगस्ट महिण्यात शेतक-यांनी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभाग यांच्या सल्ल्यानुसार एकत्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन केल्याने या हंगामामध्ये प्रादुर्भाव नियंत्रणात ठेऊ शकल्‍याचे मत उपविभागीय कृषि अधिकारी श्री बाळासाहेब कदम यांनी व्‍यक्‍त केले. मौ. जांभरून ता. अर्धापूर जि. नांदेड येथील प्रगतशील शेतकरी श्री मन्मथ गवळी यांनी विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान सल्‍लाचा शेतक-यांना फायदा होत असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.
सध्या राज्यामध्ये कापसाची फरदड घेण्यात येऊ नये म्हणून त्याचे दुष्परिणामांची माहिती देणा-या घडीपत्रिकेची विमोचन मान्येवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिके घेणा-या शेतक-यांना निविष्ठांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी केले. सूत्रसंचालक श्री अ. द. पांडागळे यांनी केले तर आभार प्रा. डी. व्हि. पाटील यांनी मानले. कार्यशाळेत कापूस फरदड निर्मूलनाबाबत प्रा. अरविंद पांडागळे यांनी तर गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत डॉ. शिवाजी तेलंग यांनी माहिती दिली. कार्यशाळाच्‍या यशस्वीतेसाठी डॉ. पवन ढोके, शेळके, पांचाळ, शिंदे, जोगपेटे, कळसकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यशाळास जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, December 5, 2018

वनामकृवित जागतिक मृदा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. डॉ. राहुल पाटील हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखलेप्राचार्य डॉ यू एन खोडके, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे, विभाग प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल, श्री एस. एच. पवार, श्री सागर खटकाळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, दिवसेंदिवस शेतीसाठी उपयुक्‍त सुपीक माती प्रदुषीत होत आहे. इमारत बांधकामासाठी वापरण्‍यात येणा-या विटांकरिता सुपीक माती वापर वाढत असुन शहरीकरणामुळे वाढलेले कचऱ्याचे प्रमाण यामुळे सुपीक मातीचा ­हास होत आहे, हे थांबविण्‍याची प्रत्येक नागरिकांची बाबदारी आहे. शेतक-यांनी जमिनीतील अन्नद्रव्यांचा उपसा व पुरवठा या मधील तुट कमी करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
आमदार मा डॉ. राहुल पाटील यांनी शाश्‍वत शेतीकरिता मिनीचे आरोग्य जपण्याची गरज असुन शेतीत विविध कृषी निवीष्ठांचा काटेकोर वापर आवश्‍यक असल्‍याचे सां‍गितले. कृषि विद्यापीठातील प्रयोगशाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्‍या पाहिजे तसेच विद्यापीठात दुष्‍काळ परिस्थितीत शेतक­यांसाठी उपयुक्‍त संशोधन व्‍हावे अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.
शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, माणसाचे आरोग्य मातीशी जुडलेले असुन मिनीचे आरोग्य बिघडलेले आहे व त्यामुळे माणसाच्‍या आरोग्‍य विषयक प्रश्न निर्माण होत आहे. संतुलीत पीक पोषण मनुष्याच्या समतोल आहारासाठी गरजेचे आहे. भावी पिढीच्या चांगल्या आरोग्‍यासाठी माती परिक्षणाच्या अहवालानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर करावा, असे मत त्‍यांनी दिला. 
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी. आर. शिंदे यांनी उत्पादन वाढीसाठी माती परिक्षण गरजेचे असल्याचे सांगितले तर श्री एस.एच. पवार यांनी जमीन आरोग्य पत्रीका वितरण अभियाणाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात कृषि विभाग व मृद विज्ञान संस्थेच्या वतीने 25 शेतक­यांना त्यांच्या शेतातील मातीचे परिक्षण करुन आरोग्य पत्रिकेचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध घडीपत्रीकांचे विमोचन करण्यात आले.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल यांनी कोरडवाहु शेतीत पिक उत्पादनात शाश्‍वतता आणण्‍यासाठी सेंद्रीय खतेहिरवळीच्या खंताच्या वापर करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ. स्वाती झाडे यांनी केले तर आभार डॉ सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. रामप्रासद खंदारे, प्रा. अनिल मोरे, डॉ.श्री अडकीणे, श्रीमती महावलकर, श्री अजय चरकपल्ली आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठातील कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्यने उपस्थित होते.

Saturday, December 1, 2018

पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कापसाचा फरदड घेऊ नये

वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचा शेतकरी बांधवाना सल्‍ला

नोव्हेबर व डिसेंबर महिन्यात रात्रीच्या तापमानात घट व रात्रीचा कालावधीत वाढ होत असल्याने गुलाबी बोंडअळीच्या पतंगाना उपजीविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्याकरीता सद्य परिस्थितीत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असुन पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किडकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी कामगंध सापळयाचा वापर करुन मोठया प्रमाणात सामुहिकरीत्या नर पतंग गोळा करुन नष्ट करावेत. जिनींग - प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामगंध सापळयातील ल्युर बदलून नवीन ल्युर लावावे. डिसेंबर महीन्यात कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्या मध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्‍याची शक्यता असुन पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्‍या शेतातील अवशेष नष्ट करणे अवश्यक आहे. डिसेंबर नंतर कपाशीचे पिक ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळते, आणि अळीच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते, तसेच बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील 5 ते 6 महिने कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते, त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबर नंतर खाद्य उपलब्‍ध नसल्यास अळी सुप्तअवस्थेत जाते. परंतू फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणून कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. कापूस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा या वापर करावा व तयार झालेला पिकाचा चुरा गोळा करुन सेंद्रिय खतामध्ये रुपांतरीत करावे. पीक काढणीनंतर खोल नांगरणी करुन जमिन उन्हात चांगली तापू दयावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे.
फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीवर पाणी देऊन पुन:श्च कापूस पिक घेतले जाते. अशा वेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, किटकनाशके यांचा वापर करुन मार्च महिन्यानंतरही कापूस पीक घेतले जाते. फरदड कपाशीला सिंचीत केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंडअळीला सतत खाद्य उपलब्ध होते. फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही त्यामुळे धाग्याची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटून कापसाला बाजारभाव कमी मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. फरदड कापूस पिकांवर येणाऱ्या अळयांना हंगामानंतर सतत खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे किडींचा पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कापूस पिकाचा कालावधी जसा-जसा वाढत जातो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे बोंडअळयांमध्ये बीटी प्रथिना विरुध्द प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते. खरीप हंगामात पिठया ढेकूण व पांढरी माशीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठया प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनात घट होते व पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्‍यामुळे पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड कपाशी न घेण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने करण्यात आले आहे.