Friday, June 14, 2019

ज्ञानाचा उपयोग समाजाच्‍या कल्‍याणासाठी करा.....माजी कृषि आयुक्त डॉ उमाकांतजी दांगट

परभणी कृषि महाविद्यालया महाराष्ट्र कृषी सेवा परिक्षा व मुलाखतीची तयारी याबाबत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न
माणुस हा ज्ञान व कर्मांनी मोठा होतो, त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त ज्ञान संपादन करा, त्‍याचा उपयोग समाजाच्‍या कल्‍याणासाठी करा, असे प्रतिपादन माजी कृषि आयुक्त डॉ उमाकांतजी दांगट यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या वतीने नुकतेच (दिनांक 7 जुन रोजी) महाराष्ट्र कृषी सेवा परिक्षा व मुलाखतीची तयारी याबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते तर मार्गदर्शक म्हणुन माजी कृषि आयुक्त डॉ उमाकांतजी दांगट व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री मधुकरराव कोकाटे हे उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ पी आर झंवर, डॉ रणजित चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ उमाकांतजी दांगट पुढे म्‍हणाले की, स्‍पर्धेपरिक्षा ही कार्यक्षम व चांगल्‍या व्‍यक्‍तींची निवड करण्‍यासाठी असते. सातत्‍याने लिखन व वाचन करा, चिंतन करा. कृषि पदवीधरांना शासकिय व खासगी क्षेत्रात मोठया संधी आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीनेच देशाची व मानवाची प्रगती झाली आहे. कृषी संस्‍कृती हीच जीवन पध्‍दती आहे. कोणत्‍याही घटनेकडे एकांगी विचार करू नका, चौफेर विचार करण्‍याची सवय लावा. आपली विवेकबुध्‍दी सतत जागृत ठेवा. ध्‍येय पुर्ण होईपर्यंत लढत रहा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ प्रदिप इंगोले म्हणाले की, बहुतेक कृषिचे विद्यार्थ्यी हे ग्रामीण भागातुन आलेले असतात तरिही कठोर परिश्रमाच्या आधारे स्पर्धेपरिक्षेत यश संपादन करतात. विद्यार्थ्यांना स्वत:मधील असलेल्या सुप्तगुणांची जाणीव झाली पाहिजे. नौकरी म्हणुन कोणत्याही क्षेत्रात काम करतांना कृषि पदवीधरांनी शेतक-यांना विसरून नये, नौकरी ही शेतक-यांची सेवा करण्याची संधी म्हणुन पाहा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मार्गदर्शनात श्री मधुकरराव कोकाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेपरिक्षेची तयारी करतांना जाणीवपुर्वक आपल्या व्यक्तीमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. विशेषत: संवाद कौशल्य विकसित करावे, संवादातुनच आपल्या व्यक्तीमत्वाची ओळख होते. मुलाखत ही ज्ञान तपासण्‍यासाठी नसुन तुम्ही माहिती कशी सादर करता, याची परिक्षा असते. स्वत:तील कमतरतेचा बाऊ करू नका, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
डॉ धर्मराज गोखले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले तर प्रास्‍ताविक डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ कल्‍याणकर यांनी मानले. प्रशिक्षणात विद्यार्थ्‍यांकडुन मुलाखतीचा सराव घेण्‍यात आला. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृवितील किटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण संपन्‍न

येत्‍या हंगामात औरंगाबाद, परभणी व नांदेड येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेत व वनामकृवितील विभागात होणार ट्रायकोकार्डची निर्मिती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि किटकशास्‍त्र विभागातील परोपजिवी किटक संशोधन योजना व कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विदयमाने क्रॉपसॅप प्रकल्‍प अंतर्गत जैविक घटक, त्‍यांची निर्मिती व किड व्‍यवस्‍थापनातील उपयुक्‍तता याबाबतचे एक दिवसीय प्रशिक्षण कृषि किटकशास्‍त्र विभाग येथे दिनांक १२ जुन रोजी संपन्‍न झाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्‍तम झंवर, जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळाचे प्रभारी अधिकारी श्री. बबन वाघ आदीची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात डॉ. प्रदिप इंगोले म्‍हणाले की, शेतक-यांमध्‍ये पिकांवरील किड व्‍यवस्‍थापनात जैविक पध्‍दतीबाबत जागरूकता होत आहे, परंतु जैविक निविष्‍ठांची योग्‍य वेळी उपलब्‍धता होत नाही कापुस पिकात ट्रायकोकार्डचा वापर केल्‍यास निश्चितच शेतक-यांना बोंडअळी व्‍यवस्‍थापन चांगला प्रकारे करता येईल. प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी ट्रायकोकार्डची निर्मिती करून येणा-या हंगामात शेतक-यांसाठी उपलब्‍ध करावेत असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर मार्गदर्शनात म्‍हणाले कि, परोपजिवी किटक संशोधन योजनेव्‍दारे शेतक-यांना मोठया प्रमाणात ट्रायकोकार्डची उपलब्‍धता करुन देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल व त्‍याव्‍दारे कमी खर्चात अधिक प्रभावीपणे गुलाबी बोंडअळीचा शेतकरी व्‍यवस्‍थापन करु शकतील.
प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले. प्रशिक्षणात डॉ. एम. एम. सोनकांबळे, डॉ. बी. व्‍ही. भेदे, डॉ. एस. एस. धुरगुडे, डॉ. ए. जी. बडगुजर आदींनी तांत्रिक सादरीकरण करुन ट्रायकोकार्ड निर्मितीची माहिती प्रशिक्षणार्थींना प्रात्‍याक्षिकाद्वारे दिली. वनस्‍पती विकृतीशास्‍त्र विभागात बायोमिक्‍स, ट्रायकोडर्मा व जैविक बुरशी निर्मितीचे प्रात्‍याक्षिक करुन दाखविण्‍यात आले. सदरिल प्रशिक्षणात शासकीय जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा येथील अधिकारी व कर्मचारी, कृषि विज्ञान केंद्रातील शास्‍त्रज्ञ, विदयापीठातील क्रॉपसॅप प्रकल्‍पातील जिल्‍हा समन्‍वयक, शास्‍त्रज्ञ आदींनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला होता. येत्‍या हंगामात औरंगाबाद, परभणी व नांदेड येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळ व विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागात ट्रायकोकार्डची निर्मिती करण्‍यात येणार आहे.

Thursday, June 13, 2019

विद्यार्थानी नैराश्यावर मात करत यशासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.... मा डॉ. अशोक ढवण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील एमएस्सी (कृषि) पदव्युत्तर विद्यार्थ्याना विभागातर्फे निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर राहुरी येथील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. अशोक कडलग, विभाग प्रमुख डॉ. सय्य्द इस्माईल, डॉ. भगवान सेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यींनी अपयशाने खचुन न जाता, नैराश्यावर मात करत यशासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. जीवनात नेहमीच सकारात्मक विचार ठेवावा. मृदविज्ञान विभागाचा शेतकऱ्यांबरोबर जवळचा संबंध असुन विद्यार्थ्यानी ज्ञानाचा वापर समाजाचा अर्थात शेतकऱ्यांच्या विकासासाठी करावा. प्रमुख पाहुणे डॉ अशोक कडलग यांनी विद्यार्थ्यांचा आयुष्यात मृदा पृथ:करणाचे तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा शेतकऱ्यासांठी उपयोग करावा असे नमुद केलेकार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमा डॉ. प्रविण वैद्य यांची नवी दिल्ली येथील भारतीय मृद विज्ञान संस्थेचे सोसायटीच्या संशोधन नियतकालिकेचे सल्लागार म्हणुन तर डॉ. पपीता गौरखेडे डॉ भगवान असेवार यांची हैद्राबाद येथील भारतीय कोरडवाहु शेती सोसायटीच्या संशोधन नियतकालिकेचे कार्यकारी सदस्य म्हणुन निवडी बदल मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन कु. सरपे या हिने केले. कार्यक्रमाविभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते.