वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, नवी दिल्ली येथील भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष आाणि भारतीय स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवी वर्षचे औचित्य साधुन दिनांक 17 व 18 नोव्हेंबर रोजी शाश्वत पिक उत्पादनाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पिक सरंक्षण यावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असुन परिसंवादाचे उदघाटन दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता लातुर कृषि महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. उदघाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन भारत सरकारचे माजी कृषी आयुक्त तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्त मायी हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार आहेत. कार्यक्रमास दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ संजय सावंत, कुषिभुषण मा श्री बी बी ठोंबरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, नवी दिल्ली येथील भारतीय पीक रोगशास्त्र संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रतिभा शर्मा, सचिव डॉ रोबिन गोगोई आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल परिसंवादात देशातील विविध राज्यातील कृषि शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्राध्यापक, कृषि उद्योजक, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी सहभागी होऊन पीक संरक्षणावर मंथन करणार असुन परिसंवादाकरिता 350 पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्राप्त झाले आहेत. परिसंवादाचे आयोजन सचिव लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंगद सुर्ववंशी, सहसचिव डॉ चंद्रशेखर अंबडकर, स्थानिक आयोजन समितीचे सचिव डॉ आनदं कारले हे असुन परिसंवादाचे आयोजन लातुर कृषि महाविद्यालय, कै विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय, गळीत धान्य संशोधन केंद्र येथील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Thursday, November 11, 2021
Wednesday, November 3, 2021
कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण यांची दुग्धतंत्रज्ञान प्रकल्पास भेट
विद्यापीठातील पशुसंवर्धन विभागातील दुग्धजन्य पदार्थास वाढती मागणी
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुसवंर्धन व दुग्धशास्त्र विभागातील नवी दिल्ली
येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थ पुरस्कृत दुग्धतंत्रज्ञानावर आधारित अनुभवातुन
शिक्षण प्रकल्पास दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी भेट
दिली. सदरिल प्रकल्पात अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातुन कृषिच्या विद्यार्थांना
दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व विपणन याबाबत आठव्या सत्रात प्रशिक्षणाच्या
माध्यमातुन व्यावसायिक ज्ञान दिले जाते. या प्रकल्पात वर्षभर नियमितपणे बर्फी, खवा,
पनीर, बासुंदी, आईसक्रीम आदी दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात
येऊन विक्री करण्यात येते. सणासुदीस काळात या दुग्धजन्य पदार्थास मोठया प्रमाणात
मागणी वाढत आहे.
भेटी दरम्यान मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने दुग्धजन्य पदार्थास विशेष महत्व आहे, परंतु काही वेळेस बाजारात या पदार्थात भेसळ होते. सदरिल प्रकल्पात निर्मिती करण्यात येणा-या दर्जेदार दु्ग्धजन्य पदार्थास शहरातील नागरिकांची मागणी वाढत आहे, प्रकल्पात स्वच्छता व पॅकेजिंग कडे विशेष लक्ष देण्यात येत आहे, ही चांगली बाब आहे. असे सांगुन प्रकल्पातील निर्मिती करण्यात येत असलेल्या पदार्थाच्या गुणवत्तेची प्रशंसा केली. गेल्या दोन ते तीन वर्षात विद्यापीठास बीजोत्पादन, रोपवाटीका, जैविक खते आदीपासुन प्राप्त होणा-या महसुलात निश्चितच वाढ करण्यात आपणास यश मिळाले आहे, तसेच सदरिल पदार्थ विक्री वाढीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
प्रकल्पाबाबत माहिती देतांना विभाग प्रमुख तथा प्रकल्पाचे प्रभारी डॉ. जी. के. लोंढे म्हणाले की, प्रकल्पातील दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीसाठी विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराजवळ सुविधा निर्माण केल्यास दुग्धजन्य पदार्थ विक्रीत वाढ होईल. तसेच विभागात कुक्कटपालन व शेळीपालन यांचे व्यावसायिक ज्ञान विद्यार्थी व शेतकरी बांधवांना नियमित दिले जात, असल्याचे सांगितले. या प्रसंगी माननीय कुलगुरु यांनी पनीर, खवा, बासुंदी आदीं पदार्थाची स्वत: खरेदी केली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ. एस. डी. बंटेवाड, डॉ. के. टी. अपेट, डॉ. एम. जी. जाधव, डॉ. एस. एस. मोरे आदीसह विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
Sunday, October 31, 2021
राष्ट्रीय पात्रता परीक्षेत परभणी कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, १५१ विद्यार्थी झाले नेट परीक्षेत उत्तीर्ण
एवढया मोठया प्रमाणात विद्यार्थी पात्र होण्याची विद्यापीठाच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात पहिलीच वेळ
विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा
नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या वतीने ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परिक्षा – नेट परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेतील १५१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असुन परभणी कृषि विद्यापीठाच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात प्रथमच एवढया मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात तीन विद्यार्थी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ व्दारे आयोजित कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विविध राज्यातील कृषि विद्यापीठे तथा कृषि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक व समकक्ष पदाकरिता राष्ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. एकुण १५१ विद्यार्थी पैकी परभणी कृषि महाविद्यालयाचे ८५ विद्यार्थ्यांचा समावेश असुन लातुर कृषि महाविद्यालयाचे ३४ विद्यार्थी तसेच बदनापुर कृषि महाविद्यालयाचे १२ विद्यार्थी आहेत.
परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे १६ विद्यार्थी नेट परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन यात प्रशांत पावसे व विर शैलेश हे विद्यार्थी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ व्दारे आयोजित कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत तर कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी नेट परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन अजय सातपुते हा कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
परभणी कृषि महाविद्यालयाचे ८५ विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि विद्याशाखेच्या २९, कृषि हवामानशास्त्राच्या १२, कृषि किटकशास्त्राच्या ११, विस्तार शिक्षण विभागाच्या १०, कृषि वनस्पतीशास्त्राच्या ८, मृदविज्ञान व रसायनशास्त्राच्या ५, उद्यानविद्याच्या ४, कृषि अर्थशास्त्राच्या ४, तर वनस्पती रोगशास्त्राच्या २ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. लातुर कृषि महाविद्यालयाचे ३४ विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि किटकशास्त्राच्या १५, कृषी विद्याच्या ११, मृदा विज्ञान व रसायनशास्त्राच्या ४, कृषि वनस्पतीशास्त्राच्या २, कृषि अर्थशास्त्राच्या १, उद्यानविद्याच्या १ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. बदनापुर कृषि महाविद्यालयाचे १२ विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि विद्या शाखेच्या ८ तर कृषि किटकशास्त्राच्या ४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
सदरिल यशाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करित असुन नेट परीक्षेतील यश म्हणजे विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा आहे. गेल्या दिड वर्षापासुन कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव व लॉकडाऊनच्या काळाचा विद्यार्थ्यांनी सदोपयोग केला, प्राध्यापकांनीही ऑनलाईन माध्यमातुन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. याचाच अर्थ राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक दर्जेचे शिक्षण विद्यापीठातुन दिले जात असुन विद्यापीठाचा शैक्षणिक स्तर उंचावल्याचे हे द्योतक आहे. तसेच कृषि संशोधन व कृषि शिक्षण क्षेत्रात करियर करण्याकडे विद्यार्थ्याचा ओढा वाढत आहे, असेही ते म्हणाले. सदरिल यशाबाबत शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ अंगद सुर्यवंशी, प्राचार्य डॉ राकेश अहिरे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे माननीय कुलगुरू यांनी अभिनंदन केले. सदरिल १५१ हा आकडा अंतिम नसुन यात अधिक भर पडु शकते.
Monday, October 25, 2021
शेती व शेतकरी कल्याणासाठी कृषि पदवीधरांनी कार्य करावे .......... कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे
वनामकृविचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
सन २०२१ ते २०२२ हे वर्ष परभणी कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणुन साजरा करण्यात येत आहे. गेल्या पाच दशकापासुन मराठवाडा विभागातील कृषि विकासा करिता परभणी कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण माध्यमातुन महत्वाची भुमिक बजावत आहे. परभणी कृषि विद्यापीठाने कृषि शिक्षणाच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण केले असुन हे कृषि पदवीधर विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. कृषिच्या पदवीधरांनी कोणत्याही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्याणाकरिता कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष तथा कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा डॉ सी डी मायी हे उपस्थित होते तर व्यासपीठावर कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, आमदार मा डॉ राहुल पाटील, दापोली येथील डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ संजय सावंत, डॉ एस टी बोरीकर, माजी कुलगुरू डॉ के पी गोरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा ना
श्री दादाजी भुसे पुढे म्हणाले की, नुकतेच महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश केला असुन यातही कृषि पदवीधर आपले योगदान देऊ शकतील. गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात संशोधनाच्या आधारे परभणी कृषि
विद्यापीठाने विविध पिकांच्या वाण, कृषि औजारे आणि कृषि तंत्रज्ञान विकसित केले
असुन हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवाच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. आज शेतकामाकरिता वाढता मंजुरांचा खर्च व
योग्य वेळी शेतमंजुरांची कमतरता ही मोठी समस्या शेतक-यांपुढे आहे. कृषि यांत्रिकीकरणास चालना देण्याकरिता संशोधनाच्या माध्यमातुन कृषि
विद्यापीठाने शेतकरी बांधवाच्या किफायतीशीर व गरजेचे नुसार कृषि अवजारे व यंत्राचा निर्मिती करण्यावर भर
देण्याची गरज आहे. अनेक शेतकरी स्वत: आपल्या शेतीत चांगले प्रयोग
करतात, या शेतक-यांच्या प्रयोगास विद्यापीठाने संशोधनात समावेश करावा. राज्याचे
मुख्यमंत्री मा श्री उध्दवजी ठाकरे साहेब शेतीकरी बाधवाप्रती संवेदनशील असुन ते
नेहमीच म्हणतात शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव परिस्थिती व लॉकडाऊन काळात मोठया
प्रमाणात संपुर्ण मानव जातीचे जनजीवन ढवळुन निघाले. परंतु या काळात शेती व शेतकरी हे थांबले नाहीत, शेतीतील
कामे अविरत चालु होती. कोठेही अन्नधान्य, फळ व भाजीपाला कमी पडला नाही की भाव वाढले नाही, याचे
सर्व श्रेय शेतकरी बांधवानांच जाते. केवळ पिकांचे उत्पादन वाढ करून शेतकरी बांधवाची परिस्थितीत फरक पडणार नसुन
उत्पन्न वाढीकरिता प्रयत्न करावे लागतील. माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकेल ते पिकेल’ अभियान प्रारंभ करण्यात आला. यात शेतकरी बांधव आपला
शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यावर भर देण्यात येत असुन शेतमालाच्या
विक्रीसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांचं
बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणे हा या अभियानाचा
उद्देश आहे. कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहे, ही चांगली बाब आहे, त्यामुळे राज्य
शासनाने कृषि योजनेमध्ये महिलांना 30 टक्के राखीव ठेवण्यात आले असुन यामुळे
महिलांचे नाव सात बारावर घेणे आवश्यक होईल.
दीक्षांत भाषणात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी म्हणाले की, केवळ तंत्रज्ञानच शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक संपन्नता प्रदान करू शकतील. देशातील कृषी क्रांती ही संशोधनाच्या माध्यमातुन कृषि तंत्रज्ञान आधारित झाली असुन कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. एकीकडे, हरितक्रांतीचे फायदे कमी होतांना शाश्वत शेती करिता आपल्यासमोर असंख्य आव्हाने आहेत. हवामान बदल या पर्यावरणीय समस्यांनी जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरडवाहू क्षेत्रात अजुनही हरितक्रांतीची गरज आहे. अन्न सुरक्षसोबतच पोषण सुरक्षा यावर भर दयावा लागले. डॉ. ढवण यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने पीक वाढीसाठी डिजिटल शेती संशोधन, जैवसमृध्द बाजरी व ज्वारीचे वाण, व्यावसायिक जैव मिश्रण बायोमिक्स संशोधन आदी मध्ये आघाडी घेतली आहे. परभणी कृषि विद्यापीठातील मनुष्यबळाचे केवळ शिक्षणाच्या क्षेत्रातच नाही तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही फार मोठे योगदान राहिले आहे. विद्यापीठाचा इतिहास हा यशाने परिपूर्ण असा आहे, आता विद्यापीठातून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांनी या इतिहासाची पुनरावृत्ती करावी. हे विद्यापीठ या भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत सेवारत आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने मोठे योगदान दिले. विद्यापीठ संशोधनाने आधीच देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. आज देशाला खाद्यतेलाची तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असुन मराठवाडा विभागातील माती आणि हवामान पारंपारिक तेलवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे, त्यामुळे विद्यापीठाने तेलवर्गीय पिकांच्या नवीन संशोधित जातीं विकसित करण्यावर भर दयावा. हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत असुन भविष्यात आपणास अनेक आव्हानांना तोंड दयावे लागेल. पिकांतील अनुवांशिक सुधारणा, एकात्मिक शेती पध्दती, संतुलित नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि वेळेवर हस्तक्षेप या बाबींचा कृषि विषयक धोरणात्मक निर्णय घेतांना विचार करावा लागेल. बदलत्या हवामानास अनुकुल नवीन प्रजातींच्या जलद विकासासाठी आनुवंशिक परिवर्तन, जनुक संपादन, जनुकीयरित्या परावर्तीत प्रजाती विकसित तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल, याला सार्वजनिक स्वीकृतीची आवश्यकता आहे. उदयोन्मुख बाजाराच्या गरजांशी नव कृषि पदवीधरांना जुळवून घ्यावे लागेल. जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, उच्च तंत्रशुद्ध उत्पादने आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बौद्धिक संपदा यासंबंधित समस्यांसह विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अलीकडे झालेल्या प्रगतीसाठी स्वत:ला सुसज्ज ठेवावे लागेल. कृषि पदवीधर भविष्यातील शेतीची आशा आहात, असे ते म्हणाले.
स्वागतपर भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्थापनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असुन आज पर्यंत कृषि शिक्षणाच्या माध्यमातुन ४७३४५ पदवीधारक विद्यापीठाने निर्माण झाले आहेत, हे उच्च शिक्षित कुशल मनुष्यबळ विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात संशोधनाच्या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांच्या सुमारे १४४ उन्नत वाण विकसित केले आहेत. शेती पध्दती, पिकनिहाय व पिकपध्दती निहाय व्यवस्थापन, पिकांवरील रोग आणि किडीपासून संरक्षण करण्याचे पुरक तंत्रज्ञान विकसित केले असुन सुमारे ८५० पेक्षा अधिक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्या आहेत. शेतीतील मजुरांचे काबाडकष्ट कमी करणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ३५ पेक्षा जास्त यंत्रे व औजारे विकसित केलेली आहेत. आज सोयाबीन व तुर पिकांचे विद्यापीठाने केलेले वाणे मोठया प्रमाणात शेतकरी बाधवामध्ये प्रचलित आहेत.
मा ना श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी अनुग्रहीत करण्यात आले. समारंभात मा ना श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कृषि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ डि के पाटील व डॉ गिते (२०१७-१८), डॉ एम के घोडके (२०१८-१९), डॉ के टी आपेट व डॉ सी व्ही अंबडकर (२०१९-२०) यांना राधाकिशन शांती मल्होत्रा पोरितोषिकाने गौरविण्यात आले. दीक्षांत समारंभात २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण १०,९९७ स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीने माननीय प्रतिकुलपती व्दारा अनुग्रहीत करण्यात आले. विविध विद्याशाखेतील ९९२२ स्नातकांना पदवी, ९७८ स्नातकांना पदव्युत्तर तर ९७ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्यात आले. समारंभात विविध अभ्यासक्रमातील विद्यापीठाने व दात्यांनी ठेवलेली सुवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ विणा भालेराव यांनी केले. कार्यक्रमास विव्दत परिषदेचे माननीय सदस्य, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक, विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कृषि संशोधनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शास्त्रज्ञ डॉ डि के पाटील व डॉ गिते यांना २०१७-१८ वर्षातील राधाकिशन शांती मल्होत्रा पोरितोषिकाने गौरविण्यात आले.
अधिक छायाचित्र करिता खालील पोस्ट पाहावी
https://promkvparbhani.blogspot.com/2021/10/blog-post_25.html



