शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवर विशेष मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र व शेकरु फाऊंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेच्या
अंतर्गत टोमॅटो पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. हा
कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली
१८ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय
भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ संवादाचे
महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रश्न विचारण्याचे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की,
"टोमॅटो पीक व्यवस्थापनासंबंधी माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांनी
अधिकाधिक प्रश्न विचारावेत, तसेच शास्त्रज्ञांनीही
शेतकऱ्यांच्या समस्यांची उकल करण्यासाठी संवाद साधावा. नैसर्गिक व यांत्रिक
उपाययोजनांवर भर देऊन कीड नियंत्रणासाठी रासायनिक औषधांचा वापर मर्यादित
करावा."
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत सांगितले की, "फवारणीसाठी
ड्रोनच्या वापरामुळे २५ ते ३० टक्के उत्पादन खर्चाची बचत होऊ शकते आणि उत्पादनात
वाढ होण्यास मदत मिळते. याशिवाय, शेतकऱ्यांना रासायनिक
औषधांची योग्य माहिती मिळावी, यासाठी विद्यापीठाच्या संशोधन
केंद्राने पुढाकार घ्यावा." त्यांनी विद्यापीठाने सुरू केलेल्या ड्रोन कस्टम
हायरिंग सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहनही शेतकऱ्यांना केले.
टोमॅटो पीक
व्यवस्थापनाविषयी नाशिक येथील कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्रज्ञ श्री. तुषार
उगले यांनी हंगाम नियोजन,
लागवड तंत्रज्ञान, पीक संरक्षण, बाजार व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगातील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन
केले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाच्या
तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरला आहे.