Thursday, February 6, 2025

पिवळी ज्वारी पोषणमूल्यांनी समृद्ध : डॉ. अशोक बडीगन्नावर यांचे प्रतिपादन

 


भाभा अनुसंशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक बडीगन्नावर यांनी बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगांसह कृषी वनस्पतीशास्त्र आणि भाभा अनुसंशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उत्परिवर्तनाद्वारे रबी पिवळी ज्वारीमध्ये उच्च उत्पादन व गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रयोगांचे निरीक्षण केले आणि तांत्रिक मार्गदर्शन केले.

डॉ. बडीगन्नावर यांनी सांगितले की, पिवळी ज्वारी ही पोषणमूल्यांनी समृद्ध असून, यात जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. याचा आहारात समावेश केल्यास विशेषतः ग्लूटेन ऍलर्जी किंवा सेलिआक रोग असलेल्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकतो. तसेच, हे धान्य पचन सुधारते, हाडे मजबूत करते, लाल रक्तपेशींच्या विकासाला चालना देते, मधुमेह नियंत्रणात ठेवते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि ऊर्जा पुरवते.

पिवळ्या ज्वारीपासून तयार होणारे पारंपारिक पदार्थ म्हणजे खिचडी, लाडू, पराठा, वडा, तांदूळ, पॅनकेक आणि डोसा. तसेच, हे प्राण्यांसाठी चारा म्हणूनही वापरण्यात येऊ शकते. उत्परिवर्तन तंत्राच्या मदतीने हुरडा ज्वारी, राळ आणि मूग पिकांमध्येही सुधारणा करण्याच्या प्रयोगांचे निरीक्षण डॉ. बडीगन्नावर यांनी केले व त्यांनी या संशोधनाविषयी समाधान व्यक्त केले.

या भेटीदरम्यान सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. राजेश धुतमल, डॉ. अंबिका मोरे, डॉ. दिलीप झाटे, डॉ. जयकुमार देशमुख, डॉ. संदीप शिंदे, डॉ. डी. जे. दळवी, डॉ. अंबालिका चौधरी, डॉ. अरुण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शेंगुळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.