Tuesday, February 4, 2025

मौजे दुर्डी येथे हरभरा पीक व्यवस्थापनावर शेतकरी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकाचे आयोजन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ फेब्रुवारी  रोजी मौजे दुर्डी (ता. जि. परभणी) येथे  शेतकरी बांधवांसाठी हरभरा पीक व्यवस्थापनावर विशेष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना हरभरा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन तसेच एकात्मिक पीक संरक्षणाच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यामध्ये पिवळे-निळे चिकट सापळे, पक्षी थांबे यांचा प्रभावी वापर, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत आणि श्री. मधुकर मांडगे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली.

या उपक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक श्री. नितिन कोल्हे आणि कार्यक्रम सहाय्यक श्री. रामाभाऊ राऊत यांनी केले. शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करून हरभरा उत्पादन वाढवावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.