सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
परभणी : केंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची
घोषणा केली आहे. जगातील तब्बल 11 कोटी लोकांची मराठी ही भाषा
असून जागतिक क्रमवारीत पहिल्या 15 क्रमांकात स्थान आहे. पण
असं असूनही अडीच हजार वर्षे जुनी मराठी भाषेसाठी हा सन्मान प्राप्त करून
घेण्यासाठी लढा द्यावा लागला. म्हणूनच मराठी भाषा समृद्ध करत तिचे संवर्धन करणे हे भावी पिढीसाठी फार मोठे आव्हान आहे असे
प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता डॉ.जया बंगाळे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने दिनांक ३० जानेवारी रोजी सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
या निमित्ताने डॉ.विद्यानंद
मनवर ,कार्यक्रम अधिकारी (रासेयो) तथा जिमखाना उपाध्यक्ष यांनी भाषेला अभिजात
दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदे याबद्दल सखोल माहिती दिली. मराठी भाषा संवर्धन
पंधरवडा निमित्ताने सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध
स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने घेण्यात
आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल या वेळी जाहीर करण्यात आला. निबंध स्पर्धा-ऋतुजा नीळ- प्रथम क्रमांक भक्ती शिंगणे-
द्वितीय क्रमांक अश्विनी सुरवसे व अपूर्वा लांडगे-तृतीय क्रमांक , काव्यवाचन स्पर्धा-
दिव्या भगत- प्रथम क्रमांक ,गायत्री स्वामी- द्वितीय क्रमांक
सदरील स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून डॉ.जया बंगाळे व डॉ.शंकर पुरी यांनी काम
पाहिले.