देशातील उच्च शिक्षणाच्या सद्यस्थितीचे चित्रण करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या वतीने २०१०-११ पासून 'अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण' (AISHE) आयोजित केले जाते. या सर्वेक्षणामध्ये देशभरातील सर्व उच्च शिक्षण संस्था सहभागी होतात. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी हे २०१०-११ पासून या उपक्रमाचा सक्रिय भाग आहे.
विद्यापीठाचे १६ अंगीकृत महाविद्यालये आणि ४३ संलग्न महाविद्यालये AISHE पोर्टलवर
नोंदणीकृत आहेत.सर्वेक्षणाद्वारे शिक्षक, विद्यार्थी नोंदणी,
अभ्यासक्रम, परीक्षा निकाल, शैक्षणिक वित्त व पायाभूत सुविधा यांसारख्या विविध बाबींची माहिती संकलित
केली जाते. तसेच, संस्थांची घनता,
एकूण नावनोंदणी गुणोत्तर (Gross Enrolment Ratio), विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर (Pupil-Teacher Ratio), लिंग
समानता निर्देशांक (Gender Parity Index) आणि प्रति
विद्यार्थी खर्च (Per Student Expenditure) यांसारख्या
शैक्षणिक विकास निर्देशांकांची मोजणी केली जाते.
'अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण' (AISHE द्वारे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग शिक्षण धोरणे तयार करण्यासाठी तसेच उच्च
शिक्षण क्षेत्राच्या संशोधन आणि विकासासाठी महत्त्वाचा ठरतो. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी AISHE चा उल्लेख "अखिल भारतीय उच्च शिक्षण माहिती व्यवस्थापन प्रणाली" असा केला पाहिजे,
असे मत व्यक्त केले.त्यांनी सांगितले की, "AISHE हे धोरणनिर्मितीसाठी एक प्रभावी साधन असून, या
डेटाचा उपयोग आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना शिष्यवृत्ती
मिळवून देण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे सर्व संस्थांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि
काळजीपूर्वक डेटा भरावा, जेणेकरून उच्च शिक्षणात
विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकेल."
दरवर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ DCF-I डेटा AISHE
वेब पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करते, तसेच
सर्व अंगीकृत व संलग्न महाविद्यालये DCF-II अपलोड करतात. शैक्षणिक
वर्ष २०२२-२३ पासून या डेटामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असून, यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर शिक्षण संचालनालयाच्या वतीने
कार्यशाळेचे आयोजन दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांनीही मार्गदर्शन केले. या
कार्यशाळेसाठी उच्च शिक्षण संचालनालय, पुणे येथून श्री स्वप्नील कोरडे,
सांख्यिकी अधिकारी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आले होते. या उपक्रमामुळे उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल
आणि शिक्षण धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीस मदत होईल, असा
विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
प्रास्ताविक नोडल अधिकारी डॉ रणजित चव्हाण यांनी केले. कार्यशाळेत विविध महाविद्यालयाच्या नोडल अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.