Tuesday, February 11, 2025

व्यक्तीपेक्षा व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे असते!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

कार्यक्षेत्रातील संतुलन आणि तणावमुक्त जीवन यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कुलसचिव कार्यालयाच्या वतीने कार्यक्षेत्रातील संतुलन आणि तणावमुक्त जीवन’ या विषयावर ११ फेब्रुवारी रोजी सिम्पोजियम सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील ध्यानसाधना तज्ज्ञ श्री. दत्ता रोकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत असून, त्यातून अपेक्षांची पूर्तता न झाल्याने नैराश्य येते. त्यामुळे व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होतो. जीवनातील समस्या अटळ असतात, मात्र त्या हाताळण्याची कला प्रत्येकाने अवगत केली पाहिजे. व्यक्तीपेक्षा व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे असते. शरीराचे अवयव दान करता येतात, पण व्यक्तिमत्त्व नाही.” या विचारातून त्यांनी सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश दिला. तसेच चांगली दिनचर्या, योग्य संगती आणि सुसंस्कारित जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख मार्गदर्शक श्री. दत्ता रोकडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्षेत्रातील संतुलन, तणाव व्यवस्थापन, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास, ध्यानसाधना आणि आपसातील स्नेहबंध वृद्धिंगत करण्याच्या विविध तंत्रांचा परिचय दिला. त्यांनी विविध उदाहरणे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तणावमुक्त जीवनाचा मंत्र दिला.

या कार्यक्रमातून मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासह कार्यक्षेत्रातील संतुलन राखण्याच्या दिशेने नवी ऊर्जा मिळाल्याची भावना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. हा उपक्रम कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आल्याने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे यांनी केले. विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजापिता ब्रम्हकुमारीजचे बी के. अर्चना दीदी, बी के. तांदळे भाई, बी के. डॉ. रोडगे बी. एम., बी. के. सीमा बहन. डॉ. एकाळे मॅडम, डॉ. अंतवाल मॅडम, डॉ सूर्यवंशी यांचीही उपस्थित होती.