Sunday, February 9, 2025

कापूस उत्पादनामध्ये परभणी जिल्हा राष्ट्रीय पातळीवर अव्वल स्थानी आणण्यासाठी निर्धार... ... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 कापुस उत्पादनवाढीसाठी शेतकरी मेळावा व कृषि प्रदर्शनाचे कृषि विज्ञान केंद्रात आयोजन


भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गतनागपूर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्था आणि परभणी येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कापुस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी परभणी जिल्ह्यात विशेष कापुस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत कापुस पिकातील दादा लाड लागवड तंत्रज्ञान, सघन लागवड तंत्रज्ञान व अतिसघन लागवड तंत्रज्ञान याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने दि. ८ फेब्रुवारी (शनिवार) रोजी शेतकरी मेळावा व कृषि प्रदर्शनाचे कृषि विज्ञान केंद्रात आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा माननीय श्रीमती लक्ष्मीताई अशोकराव देशमुख या होत्या. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक माननीय डॉ. वाय. जी. प्रसाद आणि अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य तथा प्रांत संघटन मंत्री भारतीय किसान संघचे माननीय श्री दादा लाड हे प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमासाठी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दौलत चव्हाण, विशेष कापूस प्रकल्प योजनेचे प्रमुख डॉ. अर्जुन तायडे, शास्त्रज्ञ डॉ. सुनील महाजन, डॉ. निळकंठ हिरेमणी, डॉ. सुहास करकुटे आदींची उपस्थिती होती.

उद्घाटनपर भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. परभणी जिल्हा प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित तंत्रज्ञानाच्या आधारे कापसाच्या उत्पादकतेमध्ये चांगली प्रगती करेल अशी आशा व्यक्त केली. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी एकत्रितपणे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच कार्य करावे. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. विद्यापीठाचे कापूस उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवावे. कापूस उत्पादनामध्ये परभणी जिल्हा राष्ट्रीय पातळीवर अव्वल स्थानी आणण्यासाठी निर्धार करून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ.खिजर बेग, श्री दादा लाड, डॉ. वाय. जी. प्रसाद, श्री. दौलत चव्हाण, डॉ. अर्जुन तायडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक श्री. अमित तुपे यांनी केले तर आभार श्री. श्रीधर पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी परभणी, गंगाखेड, मानवत, सेलू, जिंतूर, पूर्णा, पाथरी या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.