Thursday, February 27, 2025

मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखडाच्या कार्यशाळेचे विद्यापीठात उद्घाटन

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संबंधित सर्व संस्थांनी एकजुटीने कार्य करावे!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विस्तार शिक्षण संचालनालय आणि अटारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि म्हणाले की, कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आराखडा हा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्य करत असल्याने शेतकऱ्यांशी अतिशय जवळीक साधून त्यांची उन्नती साधण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून कृषि विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आनंद मिळतो. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची उन्नतीसाठी कृषि संबंधित सर्व संस्थांनी एकजुटीने आणि आपुलकीने कार्य करावे. यामध्ये विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असून त्यांना या पदाचा अतिशय अल्पकाळ मिळाला, परंतु त्यांनी उत्कृष्ट कार्य केले असे नमूद करून माणूस कार्यरूपीच आठवणीत राहतो असे त्यांच्या प्रती गौरव उद्गार काढले. विद्यापीठ आणि अशासकीय संस्थांद्वारे संचलित कृषि विज्ञान केंद्र यांचे कार्य उत्कृष्ट असून त्यांनी समाधान व्यक्त केले. देश पातळीवरील सर्व कृषि विज्ञान केंद्राच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनेही ४८ व्या कुलगुरूंच्या अधिवेशनात चर्चा करण्यात आली असून त्या सर्व सोडण्यात येतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

कृषि विज्ञान केंद्र हे शासनाच्या योजना तसेच विद्यापीठाद्वारे विकसित तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले पाहिजे. कृषि विज्ञान केंद्रांनी किमान पाच गावे दत्तक घेऊन त्या ठिकाणी अधिकाधिक योजना आणि विस्तार कार्यक्रम आयोजित करून त्या गावास आदर्श गाव बनवावे. याबरोबरच कृषि विज्ञान केंद्रांनी शासनाच्या सर्व योजना आणि अनुदानाचा प्रभावी वापर शेतकऱ्यांसाठी करावा. असे प्रतिपादन केले.

ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाच्या तूर, हरभरा वाणाची स्तुती देशपातळीवर होत आहे, या बाबीचा सदुपयोग करावा. विद्यापीठ केवळ पिकांचे वाण देत नसून त्यासोबत शाश्वत उत्पादनासाठी योग्य ते मापदंड / मानके ठरवून देत आहे. शास्त्रज्ञांनी साधक – साध्य -साधन यांचा समतोल ठेवून शेतकऱ्यांची उन्नती साधावी. शेतकऱ्यांना प्राथमिक तंत्रज्ञान आणि विक्री कौशल्य शिकवावे. शेतकऱ्यांना खरेदी बाजार व्यवस्थेपेक्षा  विक्री व्यवस्था आधारित विपणन कौशल्य महत्त्वाचे आहे. यातून शेतकरी त्याच्या मालाचा भाव ठरवेल. शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, वापर ड्रोन-तंत्रज्ञान यांचा वापर, तसेच हवामान अनुकूल तंत्रज्ञान याबद्दल अधिक माहिती शेतकऱ्यांना अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेत द्यावी. तंत्रज्ञान अवलंबनामधील माहिती - ज्ञान - अवलंबन हे टप्पे महत्त्वाचे असून याचे विस्तार कार्यात प्रभावी वापर करावा. परभणी कृषि विद्यापीठाद्वारे सर्व पिकांचे तंत्रज्ञानाचे आदर्श पद्धती विकसित करून राष्ट्रीय पातळीवरील त्या अवलंबल्या जातील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

प्रस्ताविका विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी मागील वर्षातील कृषि विज्ञान केंद्रांचे कार्य आणि विविध भागधारकांनी दिलेल्या प्रत्याभरणावर पुढील वर्षात करण्यात येणाऱ्या कार्याचा अहवाल सादर केला.

या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, डॉ. राजेश  क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. प्रफुल्ल घंटे, शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. प्रवीण कापसे, आदींची उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत मराठवाडा कार्यक्षेत्रातील सर्वच बाराही कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक आणि विविध विषयाचे विषय विशेषज्ञ यांनी सहभाग नोंदविला. ते सर्व मागील वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल, शेतकऱ्याद्वारे आलेले प्रत्याभरणे आणि भविष्यातील कामाचा कृती आराखडा सादर करणार आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. एस. व्ही. चिक्से, आणि प्रा. व्ही. बी. ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार  कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले.