Friday, February 28, 2025

प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत कार्यरत प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत  २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी  विज्ञानावर आधारीत प्रकल्प तयार  करुन आणले  तसेच त्यांनी त्यांच्या  प्रकल्पाची माहिती उपस्थितांना सांगितली. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता आणि मानव विकास विभाग प्रमुख डॉ. जया बंगाळे यांनी शाळेत आयोजित प्रदर्शनास भेट देऊन या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या  प्राध्यापिका, प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या समन्वयिका डॉ. वीणा भालेराव यांनी दि. २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून का साजरा करण्यात येतो, या विषयी माहिती देतांना असे विशद केले की डॉ. सी.व्ही. रामन यांनी विज्ञान क्षेत्रातील प्रकाशाविषयी मोठा शोध लावला, जो "रामन इफेक्ट"  म्हणून ओळखला जातो. या महान शास्त्रज्ञाच्या या संशोधनाची आठवण म्हणून हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्कार तसेच भारतरत्न पुरस्कार याबददल ही त्यांनी यावेळी माहिती दिली. याप्रसंगी  प्रा. प्रियंका स्वामी तथा शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका श्रुती औंढेकर यांनी केले.