Wednesday, February 12, 2025

'माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत' उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रक्षेत्र भेट

प्रत्यक्ष प्रश्नांवर तज्ज्ञांकडून सखोल चर्चामुळे शेतकरी आपल्या पिकांचे उत्पादन वाढवू शकतील!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून व संचालक विस्तार शिक्षण डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत' हा उपक्रम विविध गावांमध्ये राबविण्यात येतो.  यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले जाते. यावेळी एकूण १३ चमूमधिल विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषि विभागाच्या एकूण ५० अधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास ४०० शेतकऱ्यांना भेट दिली व त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेवून त्यास समाधानकारक उत्तरे देवून विविध विषयावर मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना सद्यस्थिती आवश्यक असलेले आणि विशेषतः कीड व रोग व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन मिळते, त्यांच्या प्रत्यक्ष प्रश्नांवर तज्ज्ञांकडून सखोल चर्चा होते. या चर्चेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या पिकांचे उत्पादन वाढवू शकतील असा विश्वास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केला.

या उपक्रमांतर्गत विस्तार शिक्षण संचालनालय आणि कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मौजे नरंगळ, खानापूर, सुजैतपूर (ता. देगलूर, जि. नांदेड) येथे शेतकऱ्यांना हरभरा, ऊस, भाजीपाला, टरबूज, ज्वारी, गहू, नारळ आणि आंबा या पिकांवरील रोग व कीड समस्या आणि त्यावरील उपाययोजनाबाबत मार्गदर्शन  केले. यावेळी किसान गोष्टीचे आयोजन केले. तसेच शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, बा. सा. को. कृ. वि., दापोलीचे माजी शिक्षण संचालक व अधिष्ठाता, डॉ. आनंद नरंगलकर, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झवर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे,  तालुका कृषी अधिकारी श्री. नरनाळीकर, पीएच.डी. विद्यार्थी आर. एस. साळवे यांचा सहभाग होता.

संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तर्फे मौजे लोहगाव आणि सायळा खटींग येथे मा. संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी मार्गदर्शन केले. त म्हणाले की, शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे वाण वापरावेत, गट शेतीच्या माध्यमातून बीजोत्पादन कार्यक्रम राबवावा. ऊस पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कार्यक्षम पाणी व्यवस्थापनाचे तंत्र यांचा अवलंब करावा. कोरडवाहू शेतीमध्ये शेती पिकासोबत शेळीपालन, कुकुटपलान, बांधावरील फळपिके, गांडूळ खत निर्मितीहळद पावडर असे जोडधंदे व शेती पूरक व्यवसाय करावेत असे प्रतिपादन केले. त्यांनी भविष्यात ऊस आणि हळद पिकाचे उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण हाती घेण्याचेही  सुचविले. त्यांनी प्रगतशील शेतकरी श्री. सीताराम देशमुख आणि श्री विठ्लराव खटींग यांच्या शेतातील अंजीर, गहू, टोमॅटो, वांगी,लसूण , कांदा इत्यादीची पिकांची पाहणी करून मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत सेंद्रिय शेती प्रकल्पाचे डॉ. आनंद गोरे, श्री. भारत खटींग, माजी सरपंच श्री. अर्जुराव देशमुख, श्री. सय्यद सिराज उपस्थित होते.

याबरोबरच अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती कार्यालय, कृषि विज्ञान केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर, बदनापूर, आणि खामगाव, ता गेवराई ),विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर आणि परभणी) केळी संशोधन केंद्र नांदेड, गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय या इतर कार्यालयांनी त्यांच्या शास्त्रज्ञांच्या चामुद्वारे मराठवाड्यातील विविध ठिकाणी जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. तसेच प्रक्षेत्र भेटी देवून मार्गदर्शन केले.

यामध्ये शास्त्रज्ञ डॉ सुर्यकांत पवार, डॉ वसंत सूर्यवंशी, डॉ.गजानन गडदे, डॉ मोहन धुप्पे, डॉ शिवाजी शिंदे, डॉ.दिगंबर पटाईत, डॉ हनुमान गरुड, डॉ. वर्षा मारवाळीकर, डॉ. नितीन पतंगे, डॉ. सोमवंशी, डॉ. सुदाम शिराळे,डॉ. दीप्ती पाटगावकर  प्रा. ए. के.घोटमुकुळे,प्रा. के. डी. दहिफळे, श्री मधुकर मांडगे, यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.